भाजपाने बुधवारी (११ मे) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एक व्हिडीओ ट्वीट करत शरद पवारांवर सडकून टीका केली. या व्हिडीओत शरद पवार यांनी कवी जवाहर राठोड यांची एक कविता म्हटली होती. भाजपाच्या टीकेनंतर शरद पवार यांनी पुण्यात पुन्हा ती कविता वाचली आणि भाजपाला प्रत्युत्तर दिलंय. “‘आम्ही पाथरवट…’ या कवितेत कष्टकऱ्यांच्या वेदना आहेत. त्याचा कोणी गैरप्रचार करत असेल तर त्यांनी आवश्य करावा,” असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं. ते आज (१२ मे) पुरंदर येथे पत्रकारांशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शरद पवार म्हणाले, “मी सांगितलेलं काव्य जवाहर राठोड यांचं आहे. जवाहर राठोड एवढंच म्हणतात की माझ्या छन्नीने तुमच्या पाषाणातून आम्ही सगळे देव घडवले. तुम्ही आम्हालाच तिथे अडवत आहात. या कष्टकऱ्याच्या वेदना आहेत.”

“कवितेचा कोणी गैरप्रचार करत असेल, तर आवश्य करावा”

“कष्टकऱ्यांच्या वेदना मांडणाऱ्या कवितेचा कोणी गैरप्रचार करत असेल, तर त्यांनी आवश्य करावा. लोक शोधतील हे कशात आलंय आणि जवाहर राठोड यांचं हे काव्य त्यांच्यापर्यंत पोहचेल,” असं म्हणत शरद पवार यांनी भाजपाला टोला लगावला.

शरद पवार यांनी वाचलेली जवाहर राठोड यांची कविता

“आम्ही पाथरवट
निर्माण करतोय चक्कीचे पाट
ज्या पाटाने पीठ आणि रोटी दिली तुम्हाला
आम्ही मात्र अन्नाच्या कण्यासाठी रोज नुसती घरघर करतोय
दुसरं काय तर आमचं दुर्दैव
आम्हीच निर्माण केलेल्या जात्यातून आम्हीच पिसले जातोय
आमच्या छिन्नी आणि हातोड्यांनी
एकदा तर कमाल केली
पाषाणातून वेरूळ, अजिंठा कोरली गेली,
उद्ध्वस्त झालेल्या आमच्या आयुष्याच्या आरशातून
शिल्पाचं सौंदर्य तुम्ही पाहता अन् म्हणता
वा! वाहवा! बहुत खूबसुरत!
तुमच्या ब्रह्म, विष्णू, महेशाला
लक्ष्मी अन् सरस्वतीला
आम्हीच रुपडं दिलंय
आता तुम्ही खरं सांगा
ब्रह्मदेव आमचा निर्माता की
आम्हीच ब्रह्मदेवाचे पिता?
अरे! आमच्या छन्नी आणि हातोड्याने
कार्ल मार्क्ससारखा आधुनिक योद्धा
आमच्याजवळ इंद्राचं सोंग घेऊन आला…”

“नोटबंदीमुळे अर्थव्यवस्था केवळ संकटात आली”

शरद पवार म्हणाले, “देशात प्रचंड आर्थिक संकट आहेतच. नोटबंदीने काय झालं? नोटबंदीमुळे अर्थव्यवस्था केवळ संकटात आली. त्याने अशाप्रकारचे अनेक निर्णय घेतले. त्या निर्णयांमध्ये लोकांना सहभागी करायचं असतं ते केलेलं नाही. करोना काळात यांनी एकदा सांगितलं सगळ्यांनी थाळी वाजवा. लोकांनी थाळ्या वाजवल्या कारण त्यांच्यवर संकट होतं. मात्र, त्याला ते उत्तर नव्हतं. अशा अनेक गोष्टी या कालखंडात झाल्यात.”


Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar answer criticism of bjp over jawahar rathod poem in pune pbs