राज्यातील कंत्राटी भरतीवरून महाविकासआघाडीच्या नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कंत्राटी भरतीचं पाप काँग्रेस-राष्ट्रवादीचं असल्याचा आरोप केला. दुसरीकडे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांनी नाक घासून जनतेची माफी मागावी, अशी मागणी केली. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली. ते रविवारी (२२ ऑक्टोबर) बारामतीत पत्रकारांशी बोलत होते.
शरद पवार म्हणाले, “या गृहस्थांची समाजात, जनमानसात नक्की काय स्थान आहे हे मला माहिती नाही. एकच उदाहरण सांगतो. ते भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. मागच्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाने त्यांना तिकीटही दिलं नव्हतं. ज्या व्यक्तीबद्दल स्वतःचा पक्ष तिकीट द्यायलाही लायक नाही असं म्हणतो त्याच्यावर आपण काय भाष्य करायचं.”
“जे पक्षाला तिकीट द्यायलाही योग्य वाटत नाहीत त्यांनी बारामतीवर…”
“बावनकुळे बारामतीवर बोलतात कारण लोकांनी बातमी वाचावी आणि बातमी छापली जावी असं वाटत असेल, तर बारामतीचा उल्लेख करावा लागतो. त्यामुळे ते बारामतीचा उल्लेख करतात. जे पक्षाला तिकीट द्यायलाही योग्य वाटत नाहीत त्यांनी बारामतीवर चर्चा करण्याचं काही कारण नाही,” असं म्हणत पवारांनी बावनकुळेंना सुनावलं.
“लोकांना बारामती काय चीज आहे हे समजतं याचा मला आनंद”
“त्यांना बारामती कळते. बारामतीचं महत्त्व समजतं. त्यामुळे पुन्हा पुन्हा ते बारामतीचा उल्लेख करत असतील. त्यामुळे सबंध महाराष्ट्राला, महाराष्ट्राच्या बाहेर लोकांना बारामती काय चीज आहे हे समजतं याचा मला आनंद आहे,” असं म्हणत पवारांनी टोला लगावला.