पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समान नागरी कायद्यावरून विरोधी पक्षांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारच्या समान नागरी कायदा धोरणावर भाष्य करत समाचार घेतला. यावेळी त्यांनी समान नागरी कायदा आणि शीख धर्माबाबत काळजी व्यक्त केली. तसेच लोकांमध्ये मोदी सरकारविरोधात नाराजी आहे. त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी या कायद्याचा प्रस्ताव आणल्याचा आरोप पवारांनी केला. ते गुरुवारी (२९ जून) पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शरद पवार म्हणाले, “देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही गोष्टी सांगितल्या. त्यात मोदींनी समान नागरी कायद्यावर त्यांनी मत मांडलं. ते म्हणाले की, एका देशात दोन वेगवेगळे कायदे कसे असू शकतात. यावर माझ्या पक्षाची भूमिका मी सांगतो. केंद्र सरकारने विधी आयोगाकडे (लॉ कमिशन) हा विषय सोपवला. विधी आयोगाने या कामात रस असलेल्या विविध संस्थांकडून प्रस्ताव मागितले.”

“विधी आयोगाकडे आलेले ९०० प्रस्ताव जाहीर केलेले नाहीत”

“यानंतर विधी आयोगाकडे ९०० प्रस्ताव आले आहेत. त्या प्रस्तावांमध्ये काय म्हटलं आहे हे मला माहिती नाही. तसं विधी आयोगानेही जाहीर केलेलं नाही. असं असलं तरी विधी आयोगासारखी जबाबदार संस्था या विषयाच्या खोलात गेली आणि त्यांनी लोकांचे अभिप्राय मागवले आणि ९०० अभिप्राय आले. आता विधी आयोगाने खोलात जाऊन या प्रस्तावांमध्ये काय शिफारसी आहेत याची माहिती देणं गरजेचं आहे,” असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून राष्ट्रवादीवर ७०,००० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप, शरद पवार म्हणाले, “फडणवीस…”

“मला काळजी एका गोष्टीची आहे की, शीख धर्मात…”

शरद पवार पुढे म्हणाले, “समान नागरी कायद्यावर शीख, ख्रिश्चन, जैन धर्मांची भूमिका काय आहे हे स्पष्ट होणं गरजेचं आहे. मला काळजी एका गोष्टीची आहे की, शीख धर्मात समान नागरी कायद्यावर वेगळं मत आहे, असं माझ्या कानावर आलं आहे. समान नागरी कायद्याला पाठिंबा देण्याची शीख धर्मियांची मनस्थिती नाही. त्याबाबत मी अधिक माहिती घेत आहे.”

“शीख धर्मातील लोकांच्या मतांकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही”

“शीख धर्मातील लोकांच्या मतांकडे दुर्लक्ष करणे किंवा विधी आयोगाकडे आलेल्या शिफारशींची नोंद न घेता यावर निर्णय घेणं योग्य होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या प्रश्नाला हात घातला आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींची एकदा स्पष्टता यावी. यावर पंतप्रधान मोदींनी किंवा इतर कुणी भूमिका मांडावी. त्यानंतर माझा राजकीय पक्ष यावर निर्णय घेईन. पूर्ण माहिती आल्यावरच निर्णय घेणं योग्य होईल,” असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं.

“लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी समान नागरी कायद्याची चर्चा”

समान नागरी कायद्याची चर्चा आत्ताच का होते आहे यावर शरद पवारांनी शंका व्यक्त केली. ते म्हणाले, “देशातील चित्र बघितल्यानंतर लोकांमध्ये सध्याच्या राज्यकर्त्यांविषयी नाराजी व अस्वस्थता आहे. या नाराजी आणि अस्वस्थतेपासून लोकांचं लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे की काय अशी शंका यायला आज जागा आहे. ही अस्वस्थता पंतप्रधान मोदींमध्ये असावी. कारण यानंतर एका वर्षात देशाच्या निवडणुका येतील. मधल्या काळात मध्य प्रदेश आणि ईशान्य भारतातील काही राज्यांच्या निवडणुका आहेत.”

हेही वाचा : “त्यांच्या मुलीचं भलं करायचं असेल तर…”; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आरोपाला शरद पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले, “खरं आहे…”

“भाजपाचा राज्यपातळीवर लोकमताचा पाठिंबा काय हे पाहण्याची गरज”

“आज केरळपासून काश्मीर-हिमाचल प्रदेशपर्यंत पाहिलं, तर आजचा सत्ताधारी पक्ष भाजपाचा लोकमताचा पाठिंबा राज्यपातळीवर काय आहे हे पाहण्याची गरज आहे. त्यात देशाचा नकाशा नजरेसमोर ठेवला की स्थिती स्पष्ट होते,” असंही पवारांनी नमूद केलं.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar answer pm narendra modi over common civil code proposal pbs
First published on: 29-06-2023 at 20:42 IST