पुणे : जनतेला बदल हवा आहे, बदलासाठी सर्वानी एकत्र यावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी केले. भाजपच्या विरोधात विरोधी पक्षांनी एकजूट करताना काँग्रेसला सोबत घेणे आवश्यक आहे. काँग्रेस हा या देशातील महत्त्वाचा पक्ष असून प्रत्येक गावात या पक्षाचा कार्यकर्ता आहे, याकडे पवार यांनी लक्ष वेधले.पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीत भाजपच्या हेमंत रासनेंचा पराभव करून निवडून आलेल्या रवींद्र धंगेकरांनी सोमवारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांची यांची पुण्यात भेट घेतली. त्यानंतर ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पवार म्हणाले, कसब्यात मविआची एकजूट दिसली. भाजपचा गड ढासळला. भाजपने कसब्यात बापट, टिळकांना डावलून निर्णय घेतले, त्यासोबतच जनतेला बदल हवा आहे, त्यासाठी सर्वानी एकत्र येण्याची गरज आहे. ते करताना काँग्रेसला सोबत घेणे आवश्यक आहे.
नारायणपेठ, सदाशिवपेठ आणि शनिवारपेठ हा भाजपचा गड आहे. त्यामुळे कसब्यात विजय होईल की नाही, याची खात्री नव्हती. कसब्यात गिरीश बापट यांनी अनेक वर्षे प्रतिनिधित्व केले होते. ते लोकांमध्ये असायचे. त्यांचे भाजप आणि त्यांच्या परिवाराशी घनिष्ट संबंध होते. पण भाजपशी संबंध नसलेल्यांशीही त्यांचे मैत्रीचे संबंध होते. त्यामुळेच त्यांचे लक्ष असलेला मतदारसंघ जड जाईल असे वाटत होते. पण या उमेदवाराचे काम परिणामकारक ठरले. हा उमेदवार कधीच चारचाकीत बसत नाही.

सतत दुचाकीवर बसून लोकांच्या संपर्कात असतो. त्याचा फायदा त्यांना झाला. रवींद्र धंगेकर यांनी मागील तीस वर्षे जे काम केले त्याला लोकांनी मते दिली, असे पवार म्हणाले.केजरीवाल यांच्या सरकारने शाळांसाठी जे काम केलंय ते पाहण्यासाठी बाहेरून लोक येतायत. राहुल गांधींनी परदेशात जाऊन वस्तुस्थिती सांगितली. त्यात चुकीचे काय आहे.

उद्धव ठाकरेंच्या खेडच्या सभेला राष्ट्रवादीचे लोकही होते, असा प्रश्न पवारांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना उद्धव ठाकरेंच्या सभेत जर राष्ट्रवादीचे लोक असतील तर आनंदच आहे. कारण आज शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकच भूमिका मांडतायत आणि या तीन पक्षांची ताकद कालच्या सभेत दिसली, असे शरद पवार म्हणाले.

पंतप्रधानांच्या पत्रावर पहिली सही माझी
पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या ९ नेत्यांनी पत्र लिहिलंय. त्यावर सर्वात पहिली सही माझी आहे, असे पवार म्हणाले.

शहाण्या माणसाबद्दल विचारा
चंद्रकांत पाटील यांच्याबाबतही शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना शरद पवारांनी शहाण्या माणसाबद्दल विचारा, असे म्हणत टोला हाणला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar appeals that people want change everyone should come together amy