रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दोन हजारांची नोट चलनातून काढून घेण्याचा निर्णय शुक्रवारी ( १९ मे ) घेतला. या निर्णयानंतर विरोधी पक्षाकडून केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही मोदी सरकारवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. एखाद्या लहरी माणसाने निर्णय घ्यावा, असा हा प्रकार आहे, असं शरद पवारांनी म्हटलं. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शरद पवार म्हणाले, “निर्णय घ्यायचे आणि त्यानंतर त्याचं दायित्व स्वीकारायचं नाही, हे चुकीचं आहे. निर्णय घेतल्यानंतर ज्यांची गुंतवणूक आहे, त्यांना बदल करून देण्याची जबाबदारी स्वीकारली जात नाही, हे यापूर्वीच्या नोटबंदीच्या निर्णयावरून दिसून आलं आहे. एखाद्या लहरी माणासाने निर्णय घ्यावा, असा हा प्रकार आहे.”

हेही वाचा : तब्बल ९ तासानंतर जयंत पाटील ईडी कार्यालयातून बाहेर, प्रतिक्रिया देत म्हणाले, “आता…”

“या निर्णयाचे परिणाम काही दिवसांत दिसतील”

“नोटबंदीच्या काळात अनेक बँका अडचणीत आल्या. नोटबंदीमुळे चमत्कार होईल, असा दावा करण्यात आला आणि आता दुसरा चमत्कार करण्यात आला आहे. या निर्णयाचे परिणामही आता काही दिवसांत दिसतील,” असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

“आगामी निवडणुका एकत्रित लढविण्याचे…”

लोकसभा आणि विधानसभेच्या जागावाटपाबाबत तिन्ही पक्षांकडून दावे-प्रतिदावे करण्यात येत आहे. यावरही शरद पवारांनी भाष्य केलं आहे. “महाविकास आघाडीत जागा वाटपासंदर्भात कोणतीही चर्चा झालेली नाही. आगामी निवडणुका एकत्रित लढविण्याचे निश्चित झालं आहे. तिन्ही पक्षांचे प्रत्येकी दोन-दोन सदस्य जागा वाटपासंदर्भात चर्चा करणार आहेत.”

हेही वाचा : “कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील निकालामुळे आगामी निवडणुका…”, शरद पवारांचं मोठं विधान

“आघाडीत पहिल्या क्रमांकाचा पक्ष कोण अन्…”

“त्यात काही अडचणी निर्माण झाल्यास उद्धव ठाकरे, मी आणि मल्लिकार्जुन खरगे चर्चा करणार आहोत. महाविकास आगाडीत मतभेत नाहीत. आघाडीत पहिल्या क्रमांकाचा पक्ष कोण आणि दुसऱ्या क्रमांकाचा कोण, याला महत्त्व नाही. तर सगळेच पक्ष महत्त्वाचे आहेत,” असं शरद पवारांनी स्पष्ट केलं.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar attacks modi government over rbi announced its decision to withdraw rs 2000 notes from circulation ssa