राष्ट्रवादीचे अध्यक्ष व केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार काँग्रेसमुळे ‘देशाचे नेते’ झाले आहेत. काँग्रेसने ‘हात’ दिला नसता तर त्यांना कोणी विचारले असते का, अशी खोचक टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सहप्रभारी श्योराज वाल्मीकी यांनी काळेवाडीत बोलताना केली. राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे आम्ही निष्ठेने काम करतो, त्यांना आमदार-खासदार म्हणून निवडून आणतो. मात्र, काँग्रेस उमेदवारांच्या विरोधात राष्ट्रवादी अपक्षांना उभे करून पाडापाडीचे व गद्दारीचे राजकारण करतात, असेही ते म्हणाले.
पिंपरी शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक ज्ञानेश्वर मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली होती, तेव्हा ते बोलत होते. महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा कमल व्यवहारे, शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर, विरोधी पक्षनेते विनोद नढे, प्रदेश सचिव सचिन साठे, महिलाध्यक्षा ज्योती भारती आदी उपस्थित होते.
महामंडळे २० नोव्हेंबरपर्यंत जाहीर
कार्यकर्त्यांची मोठी फळी नाराज असल्याचे आपल्या लक्षात आले आहे. सत्ता असून कामे होत नाहीत. काम करूनही पदे मिळत नाही, अशी त्यांची खंत राहुल गांधी यांच्या कानावर घातली. तेव्हा २० नोव्हेंबपर्यंत महामंडळे व अन्य समित्यांची पदे भरण्याची सूचना राहुल यांनी मुख्यमंत्र्यांना केल्याची माहिती श्योराज वाल्मीकी यांनी या वेळी दिली.

Story img Loader