पुणे : बारामतीचा चेहरा बदलण्याचे काम मी केले. त्यानंतर मी अजित पवार यांच्याकडे अधिकार दिल्यानंतर त्यांनी बारामतीमध्ये विकासकामे केली, हे मान्य आहे. मात्र, बारामतीची देशात कोणामुळे ओळख आहे, याची सर्वांना माहिती आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बारामतीच्या विकासाच्या मुद्द्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुनावले. नव्या पिढीकडे सूत्रे देण्याची वेळ आली आहे, असे सांगत त्यांनी बारामतीचे उमेदवार युगेंद्र पवार यांना निवडून देण्याचे आवाहन केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विधानसभा निवडणुकीतील बारामतीचे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचाराची सांगता सभा सोमवारी लेंडीपट्टा येथील मैदानावर झाली. त्यावेळी ते बोलत होते. खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. राज्यघटना बदलण्याचा मोदी सरकारचा डाव, महिलांवरील अत्याचारांच्या वाढत्या घटनांबाबतही भाष्य करत महायुती सरकारवर पवारांनी टीका केली.

हेही वाचा – क्रीडा क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या तरुणींना हा त्रास होऊ नये – विनेश फोगट

‘सन १९६७ मध्ये मी आमदार झालो. त्यानंतर पुढील वीस ते पंचवीस वर्षांत मंत्री, मुख्यमंत्री राहिलो. त्यानंतर नवी पिढी आली. त्यांनी वीस ते पंचवीस वर्षे काम पाहिले. अजित पवार यांच्याकडे अधिकार दिल्यानंतर त्यांनी बारामतीमध्ये विकासकामे केली, हे मान्य आहे. मात्र, बारामतीचा चेहरा बदलण्याचे काम आम्हीच केले आहे. देशात बारामतीची ओळख कोणामुळे आहे, हे सर्वांना माहिती आहे,’ असे पवार यांनी स्पष्ट केले.

माझी पिढी झाली. त्यानंतर अजित पवार यांची पिढी झाली. अजित पवार यांना बारामतीकरांनी संधी दिली. त्यांना तीन वेळा उपमुख्यमंत्री केले. आता पुढची पिढी युगेंद्रची आहे. त्यांच्याकडे आता बारामतीची जबाबदारी देण्याची वेळ आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते बारामती मतदारसंघातील गावागावांत फिरत आहेत. मतदारसंघातील लोकांबरोबरचा त्याचा संपर्क आणि संवाद वाढला आहे. बारामती मतदारसंघात नेमके काय करायचे आहे, याबाबत ते समजून घेत आहेत. ज्या कष्टाने आम्ही बारामतीचा विकास केला, त्यापेक्षा जास्त परिश्रम घेऊन युगेंद्र बारामतीचा विकास करतील. विकास करण्याची त्यांची जास्त क्षमता आहे, असे सांगत पवार यांनी युगेंद्र यांना निवडून देण्याचे आवाहन केले.

सभेत फलकांंची चर्चा

युगेंद्र पवार यांच्या प्रचाराच्या सांगता सभेतील एक लक्षवेधी फलक चर्चेचा ठरला. या सांगता सभेत युवकांपासून ज्येष्ठांपर्यंत अनेकांनी शरद पवार यांचे समर्थन करणारे फलक हाती घेतले होते. बारामतीत बापमाणूस, साहेबांचा आदेश आलाय, गद्दारांना पाडा, बारामती साहेबांची होती, आहे आणि इथून पुढेसुद्धा राहणार, महाराष्ट्रात यंदा तुतारीच वाजणार आणि त्याची सुरुवात बारामतीतून होणार, जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय, या एका बोटावर महाराष्ट्राचं राजकारण चालतंय, गद्दारांना शिक्षा द्यायची असते, कराल काय नाद परत? साहेब आम्ही तुमच्या आदेशाची वाट पाहतोय, पावसातला सह्याद्री असे विविध फलक सभेतील चर्चेचा विषय ठरले.

हेही वाचा – येरवड्यातील चार गुंडांना तडीपार करण्याचे आदेश

गुलाबी जॅकेटला तुतारी साडीचा उतारा

युगेंद्र पवार यांच्यासाठी बारामतीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी विविध ठिकाणी पाच सभा घेतल्या. त्यामध्ये त्यांनी परिधान केलेली साडी चर्चेची ठरली. या साडीवर राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे तुतारी वाजवणारा माणूस हे निवडणूक चिन्ह होते. त्यामुळे अजित पवार यांच्या गुलाबी जॅकेटला तुतारी साडीचा उतारा, अशी कुजबुज कार्यकर्त्यांमध्ये होती.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar campaign yugendra pawar lendipatta maidan sharad pawar talk on ajit pawar baramati pune print news apk 13 ssb