वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी एकाच व्यासपीठावर असणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीत दोघे नेते एकत्र येणार असल्याने ते काय बोलणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची ४६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी सकाळी अकरा वाजता संस्थेच्या मांजरी बुद्रुक येथील कार्यालयात होणार आहे. माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा संस्थेचे अध्यक्ष शरद पवार सभेच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. या सभेसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. त्यांच्याबरोबर सहकारमंत्री अतुल सावे, विरोधी पक्षनेते अजित पवार, संस्थेचे उपाध्यक्ष आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, संस्थेचे विश्वस्त आणि नियामक मंडळाचे सदस्य, संबंधित खात्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबरच साखर उद्योगातील तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने साखर उद्योगातील सर्वोत्कृष्ट कार्यक्षमतेसाठी दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरणही यावेळी करण्यात येणार आहे.
हेही वाचा – “मला ‘पाणीवाला बाबा’ व्हायचेय!” पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे वक्तव्य
राज्यातील राजकीय परिस्थिती गेल्या काही दिवसांपासून बदलली आहे. शिंदे फडणवीस सरकारच्या कार्यकाळात राज्यातील अनेक उद्योग बाहेर स्थलांतरीत होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसह अन्य विरोधकांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर येणार असल्याने ते काय बोलणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.