पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष म्हणून ब्राह्मण विरोधी वक्तव्याला पाठिंबा नाही. जाती-धर्माबाबत कोणीही काहीही विधाने करू नयेत, अशी समज पक्षातील नेत्यांना दिली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शनिवारी (२१ मे) ब्राह्मण संघटनांसोबत झालेल्या बैठकीत स्पष्ट केले.
राज्यातील वाढती जातीय तेढ आणि ब्राह्मण विरोधक असा आरोप होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या पुढाकारातून शरद पवार आणि ब्राह्मण संघटनांची बैठक शनिवारी (२१ मे) पुण्यातील मार्केटयार्ड परिसरातील निसर्ग मंगल कार्यालयात झाली.
यानंतर बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती प्रसार माध्यमांना देण्यात आली. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून ब्राह्मण विरोधी वक्तव्याला पाठिंबा नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केल्याचे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी सांगितले. तर ब्राह्मण समाजाच्या प्रगतीची पवार यांनी प्रशंसा केल्याचे वसंतराव गाडगीळ यांनी सांगितले.
हेही वाचा : “इतक्या वर्षांनी ब्राह्मणांची आठवण आली”, फडणवीसांच्या टीकेवर शरद पवारांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
“दोन महिन्यांपासून राष्ट्रवादी नेत्यांच्या वक्तव्याने ब्राह्मण समाज नाराज आला. अस्वस्थता दूर करण्यासाठी शरद पवार यांनी बैठक बोलावली होती. संवाद साधण्यासाठी ही बैठक झाली. तणावाचे वातावरण निवळावे हा उद्देश आहे. राजकारणाऐवजी सामाजिक विषय म्हणून याकडे पाहिले पाहिजे. या बैठकीबाबत माझी भूमिका मध्यस्थाची होती,” असे गारटकर यांनी सांगितले.