राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीवर बोलताना खासदार गिरीश बापट आणि टिळक कुटुंबाचा उल्लेख करत सूचक विधान केलं. सोमवारी (६ मार्च) रवींद्र धंगेकर भेटायला आले असताना पत्रकारांनी शरद पवारांना भाजपाच्या पराभवावर प्रश्न विचारला. त्यावेळी ते बोलत होते.
“गिरीश बापट यांचं वैशिष्ट्य म्हणजे सर्वांशी घनिष्ठ संबंध”
शरद पवार म्हणाले, “गिरीश बापट यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे भाजपा आणि त्यांच्या परिवाराशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. मात्र, पुण्यातील भाजपा सोडून इतर सर्वांशीही त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यामुळे साहजिकपणे ज्या मतदारसंघात त्यांचे लक्ष केंद्रित होते तो मतदारसंघ हा आपल्याला जड जाईल, असं आम्हाला वाटत होतं.”
“बापट आणि टिळकांना डावलून काही निर्णय घेतले, तर…”
“शेवटी शेवटी एक गोष्ट लक्षात आली की, गिरीश बापट यांच्या सल्ल्याने निर्णय घेतले की नाही याबाबत कुजबुज ऐकायला मिळाली. याचा अर्थ गिरीश बापट आणि टिळकांना डावलून काही निर्णय घेतले, तर त्याचे परिणाम होतील, अशी एक चर्चा होती. कदाचित त्याचा फायदा होईल, अशी शंका होती,” असं सांगत शरद पवारांनी सूचक वक्तव्य केलं.
“हा उमेदवार कधीच चारचाकी गाडीत बसत नाही”
“मात्र, निवडणूक झाल्यावर जी माहिती मिळाली ती म्हणजे ज्या व्यक्तीला लोकांनी निवडून दिलं ती व्यक्ती वर्षोनुवर्षे कशाचीही अपेक्षा न करता लोकांमध्ये काम करणारी होती. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा असा उमेदवार आहे जो कधीच चारचाकी गाडीत बसत नाही. हा दोनचाकी गाडीवर फिरतो. त्यामुळे दोन पाय असणाऱ्या सर्व मतदारांचं लक्ष या उमेदवाराकडे आहे. त्याचा फायदा होईल, असं ऐकायला मिळालं. ते १०० टक्के खरं ठरलं,” असंही पवारांनी नमूद केलं.
“रवींद्र धंगेकरांना यश मिळेल याची मला स्वतःला खात्री नव्हती”
दरम्यान, शरद पवारांनी रवींद्र धंगेकरांच्या विजयावरही भाष्य केलं. ते म्हणाले, “कसबा निवडणुकीतील यशाचं सूत्रं काय हे खरंतर रवींद्र धंगेकर यांनीच सांगितलं पाहिजे. धंगेकरांना यश मिळेल, असं सामान्य लोकांकडून ऐकायला मिळत होतं, पण मला स्वतःला खात्री नव्हती. त्याचं मुख्य कारण म्हणजे नारायण, सदाशिव आणि शनिवार पेठ.”
“हा भाजपाचा गड, असं अनेक वर्षे बोललं जातं”
“याच्या खोलात जायची गरज नाही. परंतु हा भाजपाचा गड आहे, असं अनेक वर्षे बोललं जातं. दुसरी गोष्ट तिथं अनेक वर्षे गिरीश बापटांनी प्रतिनिधित्व केलं होतं. बापट सतत लोकांमध्ये मिसळून राहणारे नेते आहेत,” असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं.