ओडिशातील भीषण रेल्वे अपघातात आतापर्यंत २८८ जणांचा मृत्यू झाला. तसेच शेकडो प्रवासी जखमी आहेत. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी देशाचे माजी केंद्रीय रेल्वेमंत्री आणि स्वातंत्र्यसैनिक लालबहादूर शास्त्री यांचं उदाहरण देत रेल्वे अपघात, नैतिकता आणि राजीनामा यावर भाष्य केलं. ते शनिवारी (३ जून) पुण्यात माध्यमांशी बोलत होते.
शरद पवार म्हणाले, “ओडिशा रेल्वे अपघातात २८८ जणांचा मृत्यू झाला आहे. तो अपघात आहे आणि त्याची चौकशी व्हावी अशी सर्वांनी मागणी केली आहे. या चौकशीतून सत्य समोर येईल. त्यानंतरच पुढे काही सुचवता येईल.”
“…तेव्हा लालबहादूर शास्त्रींनी नैतिक जबाबदारी म्हणत राजीनामा दिलेला”
अपघातानंतर केंद्रीय रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणीही होत आहे. याबाबत विचारलं असता शरद पवार म्हणाले, “मला आठवतं की, लालबहादुर शास्त्री रेल्वेचे मंत्री असताना दोन अपघात झाले. त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू राजीनाम्याच्या विरोधात होते. असं असूनही लालबहादूर शास्त्रींनी ही माझी नैतिक जबाबदारी आहे, मी या पदावर राहू इच्छित नाही, असं सांगत राजीनामा दिला.”
हेही वाचा : ओडिशात रेल्वे अपघातात २३८ जणांचा मृत्यू, उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “जे लोक…”
“लालबहादूर शास्त्रींचं उदाहरण देशासमोर”
“आता लालबहादूर शास्त्रींचं उदाहरण देशासमोर आहे. आत्ताच्या राज्यकर्त्यांनी त्यांना योग्य वाटेल ते करावं,” असं सूचक वक्तव्य शरद पवारांनी केलं.