सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचं प्रकरण ७ सदस्यांच्या घटनापीठाकडे सोपवण्याची ठाकरे गटाची मागणी शुक्रवारी (१७ फेब्रुवारी) फेटाळली. तसेच पुढील सुनावणी २१ फेब्रुवारीला ठेवली. यानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना याबाबत विचारलं असता त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते शुक्रवारी (१७ फेब्रुवारी) पुण्यात माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.
शरद पवार म्हणाले, “सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी मंगळवारी (२१ फेब्रुवारी) घेऊ, असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याचं मी ऐकलं. मंगळवारी काय होतं ते बघुयात. सध्या ‘इंटरेस्टिंग’ घडतं आहे. आत्ता काय होईल हे सांगणं अवघड आहे.”
कसबा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळावे घेणार आहात का?
कसबा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळावे घेणार आहात का? असा प्रश्न विचारला असता शरद पवार म्हणाले, “उमेदवार मला भेटले होते. त्यांनी एखादी चक्कर टाका असं सांगितलं. त्यामुळे विचार करू. पिंपरी चिंचवडमध्ये प्रचारासाठी गेलो, कसब्यातही जावं लागेल. एका ठिकाणी गेलं तर दोन्ही ठिकाणी जावं लागतं.”
पहाटेच्या शपथविधीवर शरद पवारांचं फडणवीसांना प्रत्युत्तर
“मी अर्धीच गोष्ट सांगितली आहे”, या देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली. “देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर भाष्य करून त्यांचं आणखी महत्त्व वाढवावं असं मला वाटत नाही. त्यांनी इतक्या दिवसांनी यावर वक्तव्य का केलं हे त्यांनाच विचारण्याची गरज आहे,” असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं.
जोतिर्लिंगांवरून आसाम सरकारला पवारांनी फटकारलं
आसामने ज्योतिर्लिंग भीमाशंकरला नाही, तर आमच्याकडे असल्याचा दावा केला. यावर शरद पवार म्हणाले, “अवघ्या देशाला माहीत आहे की १२ ज्योतिर्लिंग कुठे आहेत. असं असताना ज्योतिर्लिंगाची जागा बदलण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. यापेक्षा वेगळं काय सांगणार आहे.”
हेही वाचा : सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गटाची मागणी फेटाळली, देवेंद्र फडणवीस म्हणाले, “उद्धव ठाकरेंची शिवसेना…”
“त्यांच्या यातना वाढू नये एवढीच अपेक्षा “
“गिरीश बापट यांना खरंच प्रचारात आणण्याची गरज होती का हे मला माहिती नाही. काही दिवसांपूर्वीच गिरीश बापट यांना मी भेटून आलो. त्यांची प्रकृती चांगली नाही. त्यांच्या यातना वाढू नये एवढीच अपेक्षा आहे,” असं मत व्यक्त करत शरद पवारांनी गिरीश बापट यांना व्हिलचेअरवर आणून प्रचार केल्याबद्दल व्यक्त केलं.