माझी मुलगी लगेच राजकारणात पडेल असे नाही. तिला इच्छा पण नाही तशी, असे मी एका जुन्या मुलाखतीमध्ये म्हटले होते. पण, एकच मुलगी असली की काही हट्ट सहन करावे लागतात. मुलीबद्दलचा अंदाज सुप्रियाने चुकवला, अशी कबुली राष्ट्रवादी कॅांग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी दिली. पक्षामध्ये सामूहिक नेतृत्वाचा अवलंब करून निर्णय घेतले जातात. पण, वडील म्हणून हल्ली सुप्रिया सांगेल ते ऐकावे लागते, असेही त्यांनी सांगितले. 

हेही वाचा >>> काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेला फडणवीसांनी दिलं प्रत्युत्तर, म्हणाले…

पुणे डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या हस्ते ‘सिंगल डॉटर फॅमिली’ उपक्रमांतर्गत एकच मुलगी अपत्य असलेल्या दाम्पत्याचा सत्कार पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आला. उत्तरार्धात या दोघांची मुलाखत घेण्यात आली. त्या वेळी पवार बोलत होते. असोसिएशनचे मुख्य विश्वस्त डॉ. सुनील जगताप आणि अध्यक्ष डॉ. नीलेश जगताप या वेळी उपस्थित होते. पवार म्हणाले, घरात जे संस्कार झाले त्याचे श्रेय आईला आहे. सकाळी सात वाजता डबा करून एसटीने पाठवायची. शेती, संसार, मुलांचे शिक्षण याकडे तिचे लक्ष होते. त्यामुळे स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आणि राज्याचा प्रमुख म्हणून निर्णय घेण्याची वेळ आली तेव्हा कर्तृत्वाला संधी देण्याची भूमिका घेतली. 

निवडणुकीसाठी प्रचारादरम्यान ‘एकच मुलगी, बरं वाईट झालं तर चितेला अग्नी कोण देणार?’ असे प्रश्न ग्रामीण भागातील ज्येष्ठांनी विचारले. पण, ‘जिवंत असताना मुलीशी नीट वागण्याची चिंता करायची की मेल्यावर चितेला अग्नी कोण देणार याची चिंता करायची?’, असा प्रश्न मी विचारायचो, असेही पवार यांनी सांगितले. दिलेले काम नेमकेपणाने पार पाडणे हे मुली चोखपणे करतात. आरक्षण दिल्यानंतर ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेचा ५० टक्के कारभार महिलांच्या हाती आहे. लोकांची कामे होतात आणि भ्रष्टाचार होत नाही हा अनुभव आहे. मुली वैमानिक असल्याने विमान अपघात कमी झाले, याकडे लक्ष वेधून पवार म्हणाले, महिलांचे नेतृत्व स्वीकारावे याबाबत उत्तर भारताची मानसिकता दिसत नाही. उत्तम काम करेल या मानसिकतेतून महिलांना प्रोत्साहन दिले पाहिजे. राजकीय मतभेद झाले तरी आपल्या कर्तृत्वाने देशाची मन उंचावण्याचे काम इंदिरा गांधी यांनी केले हे वास्तव आहे. संधीची समानता असली पाहिजे. कर्तृत्वाचा मक्ता केवळ पुरुषांकडे नाही. कर्तृत्व आहे हे इंदिरा गांधीं यांच्यासह अनेक महिलांनी सिद्ध केले. 

हेही वाचा >>> गव्हाण : कशासाठी तर… फक्त मुलांचा स्क्रीनटाईम कमी करण्यासाठी

सुळे म्हणाल्या, मी आयुष्याला संघर्ष म्हणून बघत नाही. आपण अपेक्षा मापात ठेवल्या तर आयुष्य समाधानात जाते. सर्वसाधारण कुटुंबामध्ये असते तसेच आमचे बाप-लेकीचे नाते आहे. फक्त कामाचे स्वरूप वेगळे आहे. संयम या आईच्या गुणांमुळेच इतकी वर्षे संसार टिकला. आई-वडील हे माझे पहिले समीक्षक आणि टीकाकार असतात. एकत्र कुटुंबामुळे कोणाचे काही चुकले तर सगळे तुटून पडतात. जो काम करतो तोच चुका करतो. 
पुरुष मतदान करत असतील तर मी महिला खासदार कशी असू शकेन. आमचा पक्ष छोटा आहे. राज्यसभेतील चार खासदारांपैकी वंदना चव्हाण आणि फौजिया खान या दोघी महिला आहेत.  साताऱ्याच्या सभेत पवार साहेब भिजले हे दुसऱ्या दिवशी त्याचे छायाचित्रण प्रसारित होईपर्यंत ठाऊक नव्हते. त्या छायाचित्राचा परिमाम असा होईल असे वाटलेही नाही.