पुणे / जेजुरी : देशामधील प्रगतशील राज्य अशी महाराष्ट्राची ओळख होती. माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक यांनी राज्याच्या अर्थकारणाला गती दिली. मात्र सध्याचे सरकार चुकीच्या मार्गाने चालले आहे. एखादा निर्णय घ्यायचा किंवा योजना जाहीर करायची आणि खर्च कशासाठी करतो, याचे उत्तर द्यायचे नाही, असा सरकारचा प्रकार आहे. राज्याच्या इतिहासात असे राज्यकर्ते कधी पाहिले नाहीत, अशी टीका राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी जेजुरी येथे केली.

जेजुरी येथील मल्हार नाट्यगृहाचे उद्घाटन मंगळवारी शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. खासदार सुप्रिया सुळे, पुरंदरचे आमदार संजय जगताप, ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी, जयमाला इनामदार, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड, सुदाम इंगळे, माणिक झेंडे पाटील, विजय कोलते, माजी नगराध्यक्ष वीणा सोनवणे, संभाजीराव झेंडे यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा >>>कंत्राटी शिक्षकांची निवड प्रक्रिया कशी होणार? शिक्षण आयुक्तालयाने दिल्या सूचना…

पुरंदर तालुक्याने यापूर्वी अनेक चांगली माणसे राजकारणात दिली. पुरंदरचे आमदार त्यांचा वारसा चांगल्या प्रकारे चालवित आहेत. खंडोबाच्या जेजुरी नगरीमध्ये भाविक मोठ्या श्रद्धेने येतात, कलावंतांची नगरी म्हणूनही जेजुरी प्रसिद्ध आहे. मल्हार नाट्यगृहामुळे जेजुरीच्या वैभवात भर पडली आहे. अनेक कलाकार येथे तयार होतील असे पवार यांनी सांगितले.

हेही वाचा >>>भारतातील साखर उत्पादनाबाबत अमेरिकेचा महत्त्वपूर्ण दावा; जाणून घ्या, साखर उत्पादन, साखर उताऱ्याचा अंदाज

बोपदेव येथील तरुणीच्या अत्याचार प्रकरणातील आरोपींचा तपास लागलेला नाही. सरकार या विषयाकडे गांभीर्याने पहात नाही, अशी टीका खासदार सुळे यांनी केली. तर, महायुतीचे सरकार टक्केवारीचे सरकार असल्याचा आरोप आमदार जगताप यांनी केला.

पवार कार्यक्रमात रंगले

मल्हार नाट्यगृहाचे उद्घाटन झाल्यानंतर स्थानिक कलाकारांनी तबला, ढोलकीसह अन्य वाद्यांची जुगलबंदी सादर केली. पवार यांनीही अर्धातास कार्यक्रमाचा आनंद घेतला. त्यांनी कलाकारांचे व्यासपीठावर जाऊन कौतुक केले.

काळे झेंडे दाखविण्याचा भाजपच्या कार्यकर्त्यांचा प्रयत्न

जेजुरी येथील नाट्यगृह केंद्र आणि राज्य शासनाच्या निधीतून बांधण्यात आले आहे. मात्र त्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम शासकीय न करता तो काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचा कार्यक्रम केला, असा आरोप करत भाजप कार्यकर्त्यांनी शरद पवार यांना काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी तीस ते पस्तीस भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. कार्यक्रमानंतर या कार्यकर्त्यांना पोलिसांनी सोडून दिले.