राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वसुलीसाठी चीप वापराच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिलंय. फडणवीसांनी ती चीप कोणती आहे हे दाखवावं आणि त्यातून कशी वसुली होते याबाबत सांगावं म्हणजे आमच्याही ज्ञानात भर पडेल, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं. तसेच ५ वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या गृहस्थाने टीका-टिपण्णी करताना काही पथ्य पाळावी, असा सल्लाही दिला. ते पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकारांनी प्रश्न विचारला असता बोलत होते.

शरद पवार म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांनी कोणती चीप आहे ते एकदा दाखवावं. ही चीप कशी असते, त्यातून वसुली कशी होते हे सांगावं म्हणजे याबाबत आमच्याही ज्ञानात भर पडेल. मीही मुख्यमंत्री पदावर होतो. जी व्यक्ती ५ वर्षे महाराष्ट्राची मुख्यमंत्री असते त्याने टीका आणि टिपण्णी करताना काही पथ्य पाळायची असतात. मुख्यमंत्री पद ही एक संस्था आहे. त्याची प्रतिष्ठा ठेवावी लागते.”

“फडणवीसांना सत्ता नाही, ती गेली याचं दुःख होतंय”

“देवेंद्र फडणवीसांकडून या प्रतिष्ठेला धक्का लागेल असं मी काही वाचलं नव्हतं, पण आज सत्ता नाही, ती गेली याचं त्यांना इतकं दुःख होतंय. त्यांनी परवाच मी अजूनही मुख्यमंत्री आहेच असं सांगितलं. त्यांना सत्ता मिळवल्याशिवाय चैन पडणार नाही. त्यामुळे ते अखंड असं काहीतरी बोलतील, अशा निष्कर्षावर यावं की काय असं वाटतंय,” असं शरद पवार यांनी सांगितलं.

“फडणवीसांना बंगालप्रमाणे राष्ट्रभक्त महाराष्ट्रात तयार होऊ देणार नाही असं म्हणायचंय का?”

शरद पवार म्हणाले, “महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही असं फडणवीस म्हणाले. त्यांना रविंद्रनाथ टागोर, सुभाषचंद्र बोस यांच्यासारखं योगदान महाराष्ट्रात होऊ देणार नाही, त्या दर्जाचे नेतृत्व किंवा त्या दर्जाचे कवी, राष्ट्रभक्त महाराष्ट्रात होऊ देणार नाही असं म्हणायचं आहे का? जी व्यक्ती मुख्यमंत्री होती त्यांनी २ राज्यांविषयी असं बोलू नये.”

हेही वाचा : “पाहुण्यांची आपल्याला चिंता नसते”, पवार कुटुंबीयांवरील छाप्यांवरून शरद पवारांचा खोचक टोला!

“सत्ता हातातून गेली की देवेंद्र फडणवीसांना सहन होत नाही. फडणवीस आणि त्यांचा पक्ष अतिशय अस्वस्थ आहे. त्याचेच हे परिणाम आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.

Story img Loader