राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशातील इंधन दरवाढ आणि महागाईवरून मोदी सरकारवर हल्ला चढवलाय. “मनमोहन सिंग यांच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमती वाढल्यानं काही दरवाढ करावी लागली, तर आत्ता सत्तेवर असलेल्यांनी तेव्हा १० दिवस संसदेचं काम बंद पाडलं. मात्र, आज जगात या किमती कमी झाल्या तरी दर कमी झाले नाहीत,” असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं. तसेच केंद्र सध्या जो कर लावतंय त्यातील २५ टक्के कर कमी केला तरी सर्वसामान्यांना महागाईला तोंड देता येईल, असंही नमूद केलं. ते आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडमध्ये कार्यकर्त्यांशी बोलत होते.

शरद पवार म्हणाले, “मनमोहन संगि पंतप्रधान असताना मीही त्यांच्या मंत्रिमंडळात होतो. तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात दर वाढले म्हणून मनमोहन सिंग यांना नाईलाजाने इंधन दरवाढ करावी लागली. आज ज्यांच्या हातात देशाची सूत्रं आहेत त्यांनी तेव्हा १० दिवस संसदेत काम करू दिलं नाही. काम बंद पाडलं. तेव्हा जगात किंमत वाढली म्हणून इथं किंमत वाढली हे कारण सांगायला होतं. आता जगात किंमत कमी झाली तरी इथं काही दर कमी झाले नाही. इथं वाढत्याच किमती ठेवल्या.”

“२५ टक्के कर कमी केला तरी या सामान्यांना महागाईला तोंड देता येईल “

“देशाचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी सांगितलंय की केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलवर जो कर बसवला आहे त्यातील २५ टक्के कर कमी केला तरी या वाढत्या महागाईला सामान्य नागरिकांना तोंड देता येईल. पण हे सरकार त्यावर विचार करायला तयार नाही,” असं शरद पवार यांनी नमूद केलं.

हेही वाचा : …तो सुसंवाद आज पाहायला मिळत नाही, आता कोथळा काढायची भाषा केली जाते – शरद पवार

“हे महागाईचं संकट समाजातील सर्व स्तरात आहे. आम्ही कारखानदारी टिकेल आणि वाढेल कशी याचा विचार केला. आज काय होतंय? संकटं येतात. मला आठवतंय मी राज्याचं काम करत असताना टेल्को कंपनी बंद पडण्याची स्थिती होती. ती वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले,” असंही शरद पवार यांनी सांगितलं.

Story img Loader