पुणे : ज्ञानदान आणि शिक्षण क्षेत्राचा विचार करता राज्यात अजूनही विस्ताराची गरज आहे. त्यादृष्टीने अन्य राज्यांप्रमाणे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी येथे व्यक्त केले.
धायरी येथील धारेश्वर विद्या आणि क्रीडा प्रतिष्ठानच्या रौप्य महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ शुक्रवारी पार झाला. यानिमित्ताने महाराष्ट्रासह देशाच्या जडणघडणीत बहुमूल्य योगदान दिल्याबद्दल ज्येष्ठ नेते शरद पवार यांची कृतज्ञता ग्रंथतुला करण्यात आली. तसेच संस्थेच्या कार्याचा आढावा घेणार्या स्मरणिकेचे त्यांच्या हस्ते प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते.
संयोजक आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोपान उर्फ काकासाहेब चव्हाण, उद्योजक विठ्ठल मणियार, माजी खासदार अशोक मोहोळ, विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार कुमार गोसावी, चंद्रकांत मोकाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, संस्थेचे नंदूशेठ चव्हाण, श्रीरंग चव्हाण, अनिकेत चव्हाण, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्ष स्वाती पोकळे, आमदार भीमराव तापकीर उपस्थित होते. दरम्यान, कार्यक्रमावेळी मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात पवार यांना निवेदन देण्यात आले.
“जुन्या पिढीतील अनेक लोकांनी शिक्षणाची गंगा ग्रामीण भागात विस्तारण्यासाठी परिश्रम घेतले. माझी आई शारदा पवार या माझ्या जन्मावेळी लोकल बोर्डाच्या सदस्य होत्या. तत्कालीन लोकल बोर्डाचे अध्यक्ष शंकरराव मोरे यांनी शिक्षण उपक्रमांबाबत बैठक बोलावली होती आणि ती सर्वांना अनिवार्य होती. मी तेव्हा केवळ सहा दिवसांचा होतो. आई शारदा मला या बैठकीला घेऊन गेली होती. त्यामुळे मी वयाच्या सहाव्या दिवशी शिक्षणसंस्था पाहिली. तेव्हा तिने मला काय शिकवले माहित नाही. परंतु, पुढे मी अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये भरीव योगदान देऊ शकलो, असे नमूद करून पवार म्हणाले की, शिक्षणाचे माहेर घर आणि ज्ञानाचे केंद्र पुण्यापुरते मर्यादित राहिलेले नाही. काही वर्षांपूर्वी एका पिढीने शेती केली. त्यानंतरच्या पिढी शिक्षणाच्या विस्तारासाठी झटली. अण्णासाहेब आवटे, बाबूराव घोलप यांच्यासह अनेकांनी त्यासाठी योगदान दिले. शिक्षण संस्थेसाठी अनेकांनी जमिनी दिल्या, विकल्या आणि ज्ञानदानात हातभार लावला.
हेही वाचा…पिंपरी: लाभार्थी महिलांची बंद खाती सुरू करा; महापालिकेच्या बँकांना सूचना
देशातील तीन ते चार राज्य अशी आहेत. जिथे शिक्षणाचा विस्तार आणि शिक्षणाची टक्केवारी खूप मोठी आहे. यात केरळ राज्याचा प्रथम क्रमांक लागतो. त्यानंतर तामीळनाडू आणि हिमालयाच्या पायथ्याकडील ईशान्य भारतामधील काही राज्यांचा समावेश आहे. या राज्यात शिक्षणाचा विस्तार आणि शिक्षणाची टककेवारी ९१ पर्यंत आहे. या तुलनेत महाराष्ट्र काहीसे मागे आहे. त्यामुळे शिक्षणाचा विस्तार आणि ज्ञानदानाच्या गोष्टीकडे गांभीर्याने पहावे लागेल, असे पवार यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा…पिंपरी: निळ्या पूररेषेतील बांधकामांचे सर्वेक्षण; पोलीस बंदोबस्तात होणार कारवाई
ग्रंथ आपल्याला दृष्टी देणारे साधन आहे. त्यातून आपले जीवन घडते. वाचन संस्कृतीचा विस्तार व्हायला हवा. वाचनातून ज्ञान मिळते. जुने-नवे बदल समजून घेण्याची संधी ग्रंथांच्या माध्यमातून मिळत असते. त्यामुळे धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठानने आपल्या रौप्य महोत्सवी वर्षाची सांगता माझी ग्रंथतुला करून केली, याचा विशेष आनंद आहे. हा उपक्रम अतिशय उत्तम व स्तुत्य असून, या ग्रंथतुलेतील पुस्तकांचे वाचन करावे. ग्रंथांच्या वाचनातून आपले व्यक्तिमत्व घडविण्याचा प्रयत्न नव्या पिढीने करावा, असे आवाहन पवार यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक काका चव्हाण यांनी केले.
© The Indian Express (P) Ltd