पुणे : घरामध्ये पाय घसरून जायबंदी झालेले राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांना दूरध्वनी करून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
शरद पवार यांचे मानसपुत्र म्हणून दिलीप वळसे पाटील यांची ओळख होती. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी अजित पवार यांच्यासोबत जात शरद पवार यांना धक्का दिला होता. एखादी राजकीय व्यक्ती जर आजारी पडली तर त्या व्यक्तीच्या सुख दुःखात सहभागी होण्याची महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्याचे दर्शन घडवत राजकीय मतभेद बाजूला ठेवून शरद पवार यांनी दिलीप वळसे पाटील यांना दूरध्वनी केला आणि त्यांच्या तब्येतीची चौकशी केली.
या दोघांमध्ये जवळपास १५ ते वीस मिनिटं त्यांची चर्चा झाली. प्रतिभा पवार यांनीही वळसे पाटील यांच्याशी संवाद साधला. दिलीप वळसे पाटील यांच्यावर पिंपरी चिंचवडमधील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर छोटी शस्त्रक्रियाही करण्यात येणार असून डॉक्टरांनी महिनाभर आरामाचा सल्ला दिला आहे.