पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने इच्छुकांकडून अर्ज मागविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शहरातील आठही विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांकडून येत्या चार सप्टेंबरपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. विधानसभेसाठीची सार्वत्रिक निवडणूक येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडणुकीच्या तयारीत आघाडी घेतली आहे.
हेही वाचा >>> सोनगिरी, मीरगड हे दोन वेगळे गड; इतिहास संशोधक राज मेमाणे यांचे संशोधन
पक्षाचे मजबूत संघटन आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघात असलेली इच्छुकांची संख्या लक्षात घेता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी इच्छुकांकडून अर्ज मागविण्याची सूचना केली होती. त्यानुसार शहर राष्ट्रवादी काँग्रेसने ही प्रक्रिया सुरू केली आहे. आठही विधानसभा मतदारसंघातील खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना अर्जासोबत दहा हजार रुपये आणि इतर प्रवर्गासाठी पाच हजार रुपयांचे शुल्क भरावे लागणार आहे. डिमांड ड्राफ्टच्या स्वरूपातच हे शुल्क स्वीकारले जाणार असून ‘नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’ या नावाने डिमांड ड्राफ्ट इच्छुकांना द्यावा लागणार आहे. अर्ज स्वीकारण्याची वेळ सकाळी दहा ते सायंकाळी सात अशी असून अर्ज शिवाजीनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथून उपलब्ध होणार आहेत. इच्छुकांची नावे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.