नवी दिल्ली : : विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला पराभवाला सामोरे जावे लागले. पण, एका पराभवाने खचून जाणारी आम्ही माणसे नाहीत, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी दिल्लीतील पक्षाच्या विस्तारित राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत कार्यकर्त्यांना नव्या उमेदीने लढण्याचा संदेश दिला.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर दिल्लीत पहिल्यांदाच पक्षाची दिल्लीत बैठक घेण्यात आली. राज्यामध्ये औरंगजेबाच्या कबरीवरून तसेच विनोदवीर कुणाल कामरांविरोधातील वाद उफाळून आला असताना, देशातील राजकीय परिस्थिती पाहता खंबीर वैचारिक लढा देण्याची हीच वेळ असल्याचेही पवारांनी कार्यकर्त्यांना सांगितले. या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांनीही राज्यात तसेच, देशात वाढत असलेल्या धार्मिक हिंसाचाराच्या घटनांचा मुद्दाही उपस्थित केला. औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या मुद्द्यावर बैठकीत चर्चा करण्यात आली.

‘औरंगजेबाची कबर ही आमच्या शौर्याचे प्रतीक आहे, पराभवाचे नव्हे. महाराष्ट्राला गुजरात आणि मध्य प्रदेशप्रमाणे धर्माच्या राजकारणाची प्रयोगशाळा बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. धर्मा-धर्मामध्ये तेढ, द्वेष निर्माण करणाऱ्या विचारसरणीला तीव्र विरोध केला पाहिजे, या विचारसरणीविरोधात लढले पाहिजे, अशी भूमिका बैठकीत अनेक पदाधिकाऱ्यांनी मांडल्याची माहिती पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांना सांगितले.

देशातील तसेच, राज्यातील शेतीची परिस्थिती बिघडू लागली आहे. शेती अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावरही बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. २०१४ मध्ये भारत ३४ देशांना धान्य पुरवत होते, आता धान्य आयात करावे लागते. २०१२ मध्ये ३४ हजार कोटींचा कापूस आपण निर्यात केला होता, तो आता ६ हजार कोटींवर आला आहे. शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक झाले पाहिजे, असेही मत बैठकीत व्यक्त करण्यात आले.