पुणे : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा काल थंडावल्या असून उद्या मतदान होणार आहे. तर या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पुण्यातील वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ चर्चेत राहिला. या मतदारसंघातून अजित पवार गटाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे, तर शरद पवार गटाचे माजी आमदार बापूसाहेब पठारे या दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केल्याचे सर्वांनी पाहिले. त्याच दरम्यान मागील सहा दिवसांपूर्वी वडगावशेरी भागातील अजित पवार गटाचे नेते चंद्रकांत टिंगरे आणि माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांनी महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत टिंगरे आणि रेखा टिंगरे यांनी शरद पवार गटात प्रवेश देखील केला. यामुळे एकूणच महायुतीला धक्का मानला जात आहे. या सर्व घडामोडी दरम्यान चंद्रकांत टिंगरे यांच्यावर आज दुपारी अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याची घटना घडली आहे.
हेही वाचा – कात्रज भागात जुगार अड्ड्यावर छापा; १६ जणांविरुद्ध गुन्हा
चंद्रकांत टिंगरे यांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती बापूसाहेब पठारे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना मिळताच चंद्रकांत टिंगरे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात केली. या हल्लेखोरांचा पोलीस तपास करीत आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर बापूसाहेब पठारे म्हणाले की, निवडणूक मतदानाला काही तास उरले आहे. वडगावशेरी भागातील महत्वाच्या नेत्यावर, कार्यकर्त्यांवर हल्ला होणे ही अतिशय निषेधार्ह बाब आहे. विचारांची लढाई विचाराने लढली पाहिजे. हिंसेचा आधार घेऊन कोणी धमकावत असेल तर त्यांचे मनोदय यशस्वी होणार नाहीत. ही संतांची आणि वारकऱ्यांची भूमी आहे. निर्भय बनून हिंसेचा प्रतिकार केला जाईल आणि लोकशाहीच्या मार्गाने हल्लेखोरांना धडा शिकवला जाईल, अशा शब्दात या घटनेचा त्यांनी निषेध नोंदविला.
© The Indian Express (P) Ltd