यशवंतराव चव्हाण यांचा सभ्य व सुसंस्कृतपणा आडवा आल्याने महाराष्ट्राला मिळालेली पंतप्रधानपदाची संधी हुकली, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी रविवारी िपपरीत साहित्य संमेलनात दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले. वेगळ्या विदर्भाची मागणी तेथील मराठीजनांची नसून काही अमराठी व मूठभर धनदांडग्यांची आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष फ. मु. शिंदे, माजी खासदार प्रा. जनार्दन वाघमारे व माजी आमदार उल्हास पवार यांनी पवारांची मुलाखत घेतली. शाळेतील खोडकरपणा, आईविषयीची कृतज्ञता, महाराष्ट्र िपजून काढणारे दौरे, सत्तेत आल्यानंतर महिला आरक्षण व महिलांना संपत्तीत वाटा देण्याचा निर्णय, संरक्षण खात्यात महिलांना संधी, नामांतर, वेगळा विदर्भ, मराठवाडय़ाचा रखडलेला विकास आदी विविध मुद्दय़ांवर दिलखुलास उत्तरे देत पवारांनी आयुष्याचा पट पुन्हा नव्याने उलगडून सांगितला. पंतप्रधान होण्याची संधी यशवंतराव चव्हाणांना होती. तेव्हा त्यांनी इंदिरा गांधी यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतो, अशी भूमिका घेतली. तुम्ही त्यांच्या जागेवर असता तर काय केले असते, या प्रश्नाला उत्तर देताना पवारांनी ती घटना विस्ताराने सांगितली. लालबदादूर शास्त्री यांचे निधन झाल्यानंतर यशवंतरावांनी पंतप्रधान व्हावे, असे सर्वाना वाटत होते. समर्थकांसमवेत त्यांच्या निवासस्थानी बैठक झाली, त्यात मीही होतो. इंदिरा गांधी यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेऊ, असे यशवंतरावांना वाटत होते. मात्र, तसे करू नये, अशी माझी भूमिका होती. तरीही ते इंदिरा यांच्याकडे गेले. सहा तासांचा अवधी इंदिरा यांनी मागून घेतला. त्या स्वत:चे नाव पुढे काढतील, अशी भीती आपण व्यक्त केली, तेव्हा ते माझ्यावरच रागावले होते. थोडय़ाच वेळात इंदिराजींचा चव्हाणांना दूरध्वनी आला आणि त्यांनी स्वत: पंतप्रधान होत असल्याचे स्पष्ट केले. यशवंतरावांचा सभ्यपणा आणि सुसंस्कृतपणा आडवा आल्याने महाराष्ट्रासाठी चालून आलेली पंतप्रधानपदाची संधी हुकली, असे आपल्याला वाटते, असे पवारांनी स्पष्ट केले.
वेगळा विदर्भ आणि मराठवाडय़ातील विकासाविषयीच्या प्रश्नावर बोलताना पवार यांनी, वेगळ्या विदर्भाची मागणी मराठी माणसाची नाही तर मूठभर धनदांडग्यांची आहे. तो घटक बहुतांशी अमराठी आहे. मराठी भाषकांच्या मनात वेगळ्या विदर्भाचा विचार नाही, असे स्पष्ट केले. वेगळ्या विदर्भाची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. मात्र, वेगळ्या विदर्भाचा मुद्दा घेऊन ज्यांनी-ज्यांनी निवडणुका लढवल्या, काही अपवाद वगळता त्यांचा पराभव झाला आहे आणि हा पराभव विदर्भातील बहुसंख्य असलेल्या मराठी भाषकांनीच केला आहे. मूठभर धनाढय़ मंडळींच्या माध्यमातून वेगळ्या विदर्भाची मागणी पुढे केली जाते. महाराष्ट्रापासून वेगळे होण्याची भावना विदर्भातील मराठी माणसांमध्ये नाही. काही गोष्टी राजकीय स्वार्थामुळे होत असतील, असे ते म्हणाले. मराठवाडय़ात विकासाची अस्वस्थता जाणवते. तो कळीचा मुद्दा आहे. नैराश्याची परिस्थिती निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
संवादकांचे ‘ कथाकथन’
शरद पवार यांची मुलाखत जवळपास तासभर चालली. संवादकांनी निवेदन करताना व अन्य किस्से सांगण्यात बराच वेळ घेतल्याने पवारांना खूपच कमी वेळ मिळाला. फ. मु. िशदे प्रश्न विचारत होते की व्याख्यान देत होते, असा प्रश्न उपस्थितांना पडला होता. उल्हास पवार यांनी प्रश्न विचारताना बराच पाल्हाळ लावला होता. मंडपात पवारांना ऐकण्यासाठी गर्दी होती. मात्र, त्यांना संवादकांचे ‘कथाकथन’ ऐकावे लागले. आपण पवारांच्या किती जवळचे आहोत, हे दाखवण्याचा संवादकांचा अट्टहास दिसून येत होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा