भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे म्होरके कोण असेल तर शरद पवार आहेत अशी टीका अमित शाह यांनी केली आहे. भ्रष्टाचाराला संस्थात्मक रुप देण्याचे काम हे शरद पवार यांनी केलं आहे अशी घणाघाती टीका अमित शाह यांनी पुण्यात भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत केली. एवढंच नाही तर जेव्हा जेव्हा राज्यात भाजपाची सत्ता आली तेव्हा मराठ्यांना आरक्षण मिळालं आहे, जेव्हा शरद पवार यांची सत्ता येते तेव्हा मराठा आरक्षण जाते. २०१४ ला भाजपा सत्तेत आली मराठा आरक्षण आलं, २०१९ ला शरद पवार सत्तेत आले मराठा आरक्षण गेलं तेव्हा तुम्ही ठरवा काय करायचं ते असं अमित शाह यावेळी म्हणाले.
पुण्यात भाजपाच्या दोन दिवस राज्य कार्यकारिणीचे आयोजन केले होते. याचा समारोप केंद्रीय गृहमंत्री, भाजपाचे नेते अमित शाह यांच्या उपस्थित झाला. ३९ मिनिटांच्या भाषणात अमित शाह यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली, त्यांना प्रमुख लक्ष्य केले. काँग्रेस काळात, शरद पवार केंद्रात मंत्री असतांना महाराष्ट्रावर कसा अन्याय झाला याचा पाढा शाह यांनी वाचला. २०१४ ते २०१९ हा कार्यकाळ महाराष्ट्राच्या इतिहासात विकासासाठी सर्वात जास्त लक्षात राहिल असं सांगत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची स्तुती केली.