पुणे : राज्यात राजकीय स्थित्यंतरे होत असतानाच ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार’ पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा बुधवारी या पक्षाच्या बैठकीनंतर रंगली. मात्र पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी विलीनीकरणाचा मुद्द्याचे तातडीने खंडन केले. पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह यासाठी सर्वोच्च न्यायालयात लढा सुरू असला तरी, प्रदीर्घ न्यायालयीन प्रक्रियेची शक्यता असल्याने नवीन नाव आणि चिन्हासह आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासंदर्भात ही बैठक होती. तशी सूचना पवार यांनी केल्याचा दावा करण्यात आला. दरम्यान, काँग्रेसला न दुखविण्याची सूचनाही पवार यांनी या बैठकीत केल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा >>> ‘इंडिया’ आघाडीचा २४ फेब्रुवारीला पुण्यात महामेळावा
आगामी लोकसभा आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने शरद पवार यांच्या मोदीबाग येथील कार्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतरची पक्षाची ही पहिलीच मोठी बैठक होती. खासदार सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण, श्रीनिवास पाटील, डाॅ. अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार, संदीप क्षीरसागर, माजी मंत्री अनिल देशमुख, राजेश टोपे, शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील यांच्यासह अन्य प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
या बैठकीनंतर पुणे जिल्ह्यातील एका माजी पदाधिकाऱ्याने काँग्रेसमध्ये विलीनीकरणासंदर्भातील चर्चा या बैठकीत झाल्याचा दावा एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला. त्यानंतर विलीनीकरणाचा मुद्दा रंगण्यास सुरुवात झाली. त्याची चर्चा सुरू असतानाच पक्षाच्या नेत्यांनी मात्र त्याचे तातडीने खंडन केले. सुप्रिया सुळे, रोहित पवार, डाॅ. अमोल कोल्हे यांनी विलीनीकरणाच्या संदर्भात कोणतीही चर्चा झाली नसल्याचे सांगितले. केंद्रात आणि राज्यात सुरू असलेली दडपशाही जतना पहात आहे. त्यामुळे जनतेपर्यंत पोहोचून त्यांना धीर द्यायचा आहे. नवे पक्ष आणि निवडणूक चिन्ह घेऊन निवडणुकीला सामोरे जायचे आहे, असा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आल्याचा दावा नेत्यांकडून करण्यात आला.
हेही वाचा >>> पुण्यात घरांची विक्री जोरात! जाणून घ्या कोणत्या घरांना पुणेकरांची मिळतेय पसंती
दरम्यान, आगामी निवडणुकीत काँग्रेसला न दुखविण्याची सूचना केल्याची माहितीही काही पदाधिकाऱ्यांनी दिली. महाविकास आघाडीतील मित्र पक्षांशी सुसंवाद साधा, असे सांगणे म्हणजे विलीनीकरण होत नाही, असा दावाही करण्यात आला.
पक्षाचा लढा सत्तेसाठी नसून, अस्तित्वासाठी आहे. त्यामुळे कुठेही विलीन होण्याचा प्रश्नच नाही. आगामी निवडणुकीत शरद पवार यांच्या नेतृत्वात लढून ऐतिहासिक विजय मिळविला जाईल. इंडिया आघाडीचा पुण्यात पुढील आठवड्यात मेळावा होणार आहे. – प्रशांत जगताप, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार