देहूरोड छावणी मंडळाच्या हद्दीतील ऐतिहासिक धम्मभूमीच्या जिर्णोद्धाराच्या कामाला संरक्षण विभागाकडून परवानगी मिळाली, अशी विनंती ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे केली आहे. शरद पवारांनी राजनाथ सिंह यांना पत्र लिहिलं आहे. देहूरोड हद्दीत असलेल्या धम्मभूमीबद्दल लाखो लोकांच्या मनात आस्थेची भावना असून त्याच्या जिर्णोद्धाराचं काम करण्यात येत आहे. त्यासाठी बुद्ध विहार कृती समितीने देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे आवश्यक कागदपत्रं सादर करून परवानगी मागितली आहे.

हा परिसर संरक्षित क्षेत्रात म्हणजेच रेड झोनमध्ये असल्याने त्या जागेवर बांधकामाच्या परवानगीसाठी संरक्षण मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मावळचे आमदार सुनील शेळके यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि त्यांना मध्यस्थी करण्याची विनंती केली. याचा संदर्भ देऊन धम्मभूमी जिर्णोद्धारासाठी विशेष परवानगी देण्याची मागणी पवारांनी संरक्षण मंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

याच मागणीसाठी मावळचे खासदार श्रीरंग बारणे, राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके, टेक्सास गायकवाड यांनी दिल्लीत संरक्षणमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेतली. यावेळी देहूरोड धम्मभूमीच्या जिर्णोद्धारासाठी परवानगी द्यावी, तसंच देहूगाव ते निगडी पालखी मार्गावर संरक्षण विभागाच्या हद्दीतील रस्ता रुंदीकरणास मंजुरी द्यावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.