अतिवृष्टीच्या प्रदेशात डोंगर पायथ्याशी वसलेल्या गावांच्या पुनर्वसनाचा विचार करण्याची वेळ आली असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी सांगितले. पवार यांनी दुर्घटनाग्रस्त माळीण गावाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना या दुर्घटनेनंतर आता दूरदृष्टीने पुढील विचार केला पाहिजे, असे स्पष्ट केले.
ते म्हणाले, डोंगर पायथ्याशी वसलेल्या गावांच्या पुनर्वसनाचा विचार करण्याची वेळ आली आहे. सध्या ही दुर्घटना कशामुळे झाली असेल, यावर विचार करण्यापेक्षा घटनास्थळी अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी आणि मातीचा ढिगारा लवकरात लवकर उपसण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
पवार यांनी मंचरमधील रुग्णालयात जाऊन तेथे दाखल करण्यात आलेल्या जखमींचीही विचारपूस केली. त्यांच्यासोबत स्थानिक आमदार दिलीप वळसे-पाटील हे देखील यावेळी उपस्थित होते.
माळीणमध्ये बुधवारी सकाळी दरड कोसळून गावातील बहुतांश घरे मातीच्या ढिगाऱयाखाली गाडली गेली. आतापर्यंत ३० जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, १०० हून अधिक लोक मातीच्या ढिगाऱयाखाली अडकले आहेत.

Story img Loader