पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवार यांच्या राज्यात ठिकठिकाणी सभा होत असतानाच पुण्यातही विजयादशमीच्या निमित्ताने सभा होण्याची शक्यता आहे. कर्जतचे आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेला दसऱ्यापासून सुरुवात होणार असून, या निमित्ताने पवार यांची सभा होणार आहे. त्याबाबतचे नियोजन राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून सुरू झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रेची घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी या यात्रेचे आयोजन करण्यात आले असून, २४ ऑक्टोबरपासून पुण्यातून या यात्रेला प्रारंभ होणार आहे, तर नागपूर येथे यात्रेचा समारोप होणार असून, नागपूर येथील सभाही पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
हेही वाचा – पिंपरी: स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगतापांच्या स्वीय सहाय्यकाचा शरद पवार गटात प्रवेश!
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवार यांच्या राज्यात ठिकठिकाणी सभा होत आहेत. बीड, येवला आणि कोल्हापूर येथे पवार यांनी सभा घेत राज्यातील सरकारवर जोरदार टीका केली होती. पुणे जिल्ह्यातही त्यांच्या सभेसाठी पदाधिकाऱ्यांकडून प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, युवा संघर्ष यात्रेदरम्यान एकूण ८२० किलोमीटर लांबीची पदयात्रा काढण्यात येईल. एकूण १३ जिल्ह्यांतून या यात्रेचा प्रवास होणार आहे. ४५ दिवसांच्या या यात्रेत युवकांच्या अनेक प्रश्नांवर चर्चा करण्यात येईल. कंत्राट भरती पद्धत रद्द करावी, तलाठी भरतीसाठी घेतलेले शुल्क परत करावे, शाळा दत्तक अध्यादेश रद्द करावा, अनेक उद्योग राज्यात आणावेत, अशा मागण्या यात्रेच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत, असे आयोजक, आमदार रोहित पवार यांनी सांगितले.