पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी सभा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शरद पवार यांची पुण्यात सभा होणार आहे. या सभेत पवार यांच्या उपस्थितीमध्ये काही मोठ्या नेत्यांचे पक्षप्रवेश होणार आहेत. त्यामुळे पवार कोणत्या पक्षाला धक्का देणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि पंंतप्रधान मोदींच्या सभेनंतर ही सभा होणार असल्याने या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

पवार यांची ही सभा शुक्रवारी (२७ सप्टेंबर) सायंकाळी सहा वाजता खराडी येथील झेन्सार कंपनीच्या मैदानावर होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने तयारी सुरू केली आहे. शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांतील इच्छुक उमेदवारांकडून पक्षाने अर्ज मागविले असून, येत्या काही दिवसांत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती होणार आहेत. त्या दृष्टीने शरद पवार पुण्याचा सातत्याने दौरा करत आहेत. लोकसभा निवडणुकीतील यशानंतर पवार यांच्या पक्षात येण्यासाठी अनेक नेते, माजी आमदार इच्छुक आहेत. येत्या काही दिवसांत या सर्वांचे टप्प्याटप्प्याने पक्षप्रवेश होतील, असे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार खराडी येथील या सभेत पवार कोणाला पक्षात घेऊन कोणत्या पक्षाला धक्का देणार, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

हेही वाचा >>>पंतप्रधानांच्या सभास्थळी चिखल, उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी; जेसीबीच्या साहाय्याने खडी टाकून…

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, गुरुवारी (२६ सप्टेंबर) शिवाजीनगर-स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गिकेच्या उद्घाटनासाठी आणि स्वारगेट-कात्रज या विस्तारित मेट्रो मार्गिकेच्या कामांच्या भूमिपूजनासाठी पुण्यात येणार आहे. या निमित्ताने भारतीय जनता पक्षाकडून सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या प्रांगणात मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळीही मोदी यांची रेसकोर्स येथे सभा झाली होती. या सभेत पवार यांच्यावर कडव्या शब्दांत टीका करताना मोदी यांनी पवार यांचा उल्लेख ‘भटकता आत्मा’ असा केला होता. त्याचे तीव्र पडसाद उमटले होते. या सभेनंतर वारजे येथे शरद पवार, शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संयुक्त सभा झाली होती. त्यामध्ये मोदींच्या टीकेला उत्तर देण्यात आले होते. त्यामुळे गुरुवारी मोदी यांनी पुण्यात येऊन पवार यांच्यावर टीका केल्यास ते सभेतून काय उत्तर देतात, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.