भाजपाचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांचं २९ मार्च रोजी दीर्घ आजाराने निधन झालं. त्यांच्या निधनानंतर पुण्यासह महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त करण्यात आला. सर्वच पक्षांमधील नेतेमंडळींशी मित्रत्वाचे संबंध असणाऱ्या राज्यातील काही नेत्यांपैकी गिरीश बापट एक होते. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर सर्वच पक्षातील नेत्यांकडून वेळोवेळी आठवणींना उजाळा दिला जात आहे. गिरीश बापट यांच्या शेवटच्या दिवसांमधली अशीच एक आठवण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितली आहे. पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित श्रद्धांजली सभेत ते बोलत होते. यासंदर्भातली एक सविस्तर पोस्ट शरद पवारांनी आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केली आहे.
“पालिकेत सुसंस्कृत भूमिका घेण्याचं काम त्यांनी केलं”
“पुण्याच्या महानगरपालिकेत सुसंस्कृत भूमिका घेण्याची तयारी काही भिन्न राजकीय विचाराच्या सहकाऱ्यांनी घेतली व ती जतन केली. पुण्यामध्ये अशा प्रकारचे चित्र निर्माण झाले तर ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरायला काही वेळ होणार नाही. ते काम करण्यासंबंधीची कामगिरी गिरीश बापट यांनी अखंडपणाने केली”, असं शरद पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
टेल्को कंपनीतला ‘तो’ संप!
दरम्यान, गिरीश बापट टेल्को कंपनीत काम करत असतानाची एक आठवण शरद पवारांनी सांगितली. “पुण्यात टेल्को महत्त्वाची कंपनी होती. तिथे गिरीश बापट काम करायचे. अतिशय उत्तम चालणारी कंपनी. पण त्या ठिकाणी संप झाला. संपाच्या नेतृत्वाने टोकाला जाण्याचे काम केले. चाळीस दिवसांपेक्षा अधिक काळ टेल्कोमध्ये संप होता. वाटाघाटी केल्या. पण नेतृत्व चमत्कारिक होते. त्यामुळे मार्ग काही निघेना. त्या लोकांनी शनिवार वाड्याला जाऊन निर्दशने करण्याचा निर्णय घेतला आणि रात्री मुक्कामाला राहण्याची भूमिका घेतली. पोलिस दल एकत्र आले. रातोरात अटक झाली. कामगारांच्या लक्षात आले की चुकीच्या नेतृत्वाखाली आपण वागलो की त्याचे दुष्परिणाम होतात. चौकटीच्या बाहेर कधी कामगार चळवळीत जायचं नाही अशी भूमिका मानणारे थोडे कामगारमधील होते, त्यामध्ये गिरीश बापट होते”, असं शरद पवार म्हणाले.
टेल्को कंपनीत कामगार ते खासदार; गिरीश बापट यांची कारकिर्द
“आज गिरीश बापट आपल्यातून गेले. मी त्यांना आजारी असताना भेटायला गेलो तेव्हा ते मला आत्मविश्वासाने सांगत होते की मी यावर मात करणार. मी ही त्यांना सांगितले की तुम्हाला जो त्रास आहे तो मलाही आहे. २००४ मध्ये मला डॉक्टरांनी सांगितले होते की तुमच्याकडे साधरणतः सहा महिने आहेत. तुम्हाला काही गोष्टी करून ठेवायच्या असतील तर करून ठेवा. तेव्हा मी त्या डॉक्टरांना वय विचारले. ते डॉक्टर तरुण होते. त्यांना मी म्हटले की तुम्हाला मी पोसायला येईल तुम्ही काही चिंता करू नका”, असं शरद पवारांनी या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.
“२००४ नंतर आज २०२३ आले आहे. मी अजून जागेवर आहे. या प्रकारचा विश्वास मी मु्द्दाम गिरीश बापट यांना दिला होता. भक्कमपणाने तोंड देऊन मी यातून गेलो आहे. त्यांनी मला सांगितले की मीही याच्याशी संघर्ष करणार. भक्कमपणे तोंड देणार. दुर्दैवाने त्यांना या संघर्षात यश आले नाही”, असं शरद पवारांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.