गेल्या अनेक वर्षांपासून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी मागणी केली जातेय. सरकार पातळीवर याकरता प्रयत्नही सुरू आहेत. शरद पवारांनीही आता हीच मागणी केली आहे. पुण्यातील शरद क्रिडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान या संस्थेच्या रौप्य महोत्सवी सोहळ्यात ते बोलत होते.
“गेली अनेक वर्ष मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी एक चळवळ सुरू आहे. आत्ताच सुप्रियाने सांगितल्याप्रमाणे संसदेत काम करणाऱ्या आम्ही सर्व संसद सदस्यांनी मागणी केली, पण तो प्रश्न अद्याप सुटलेला नाही. दिल्लीमध्ये काही लोक वेगळी भूमिका मांडतात आणि प्रामुख्याने समज गैरसमज असा आहे की मराठी भाषा ही संस्कृतपासून पुढे जनमानसात पोहोचली आहे, ही वस्तुस्थिती अजिबात नाही”, असं शरद पवार म्हणाले.
हेही वाचा >> कोल्हापूरकडे महत्वाची जबाबदारी; मराठी भाषेत अभिजात भाषेचा दर्जा समितीच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर मुळे
मराठी भाषेला पूर्व इतिहास आहे
“संस्कृतच्या पुढे सुद्धा मराठी भाषा लोकमान्यता मिळालेली भाषा होती. जुन्या काळातील अनेक शिलालेख आपण काढले तर त्या काळामध्ये सुद्धा मराठी भाषेमध्ये लिखाण केलेलं होतं, ही गोष्ट आपल्याला सहजपणाने बघायला मिळते. त्यामुळे संस्कृत आणि मराठी भाषा यामध्ये कारण नसताना प्रश्न निर्माण न करता मराठी ही मराठी आहे तिचा पूर्व इतिहास आहे तिला मान्यता आहे. त्या भाषेच्या माध्यमातून प्रचंड लिखाण आणि ज्ञान जनमाणसांसमोर केलेले आहे. त्यामुळे अभिजात दर्जा मागण्याच्या संबंधीचा अधिकार हा मराठी भाषिकांचा आहे”, असंही ते म्हणाले.
हेही वाचा >> आरक्षणाबाबत सरकारची भूमिका अस्पष्ट; सर्वपक्षीय बैठकीला न जाण्याबाबत शरद पवार यांचे स्पष्टीकरण
बारामतीने दोन कवी दिले
“मला आनंद आहे की शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने या संबंधित अतिशय चांगलं पुस्तक, काव्यसंग्रह प्रसिद्ध केलेला आहे. त्यामध्ये जवळपास ६०० कवींनी मराठी भाषा अभिजात दर्जा मिळण्यासंबंधीचा आग्रहाबद्दल ६०० कविता लिहिल्या आहेत. पुस्तकातली यादी वाचली, कवींची गावं वाचली तर महाराष्ट्रातील एक सुद्धा गाव त्यामध्ये राहिले असं दिसत नाही. कदाचित एक दिसतंय पण तो अपवाद आहे ते गाव म्हणजे बारामती. बारामती इथे का नाही? असे कोणी विचारत होतं. अनेक कवी अनेक ठिकाणचे आहेत बारामतीकरांना असे वाटले असेल अनेकांच्यामध्ये आपण जाण्याचे कारण नाही. कारण आपल्याकडे दोन मोठे कवी होऊन गेले एक म्हणजे श्रीधर स्वामी आणि दुसरे मोरोपंत ज्यांनी आर्या लिहिली. इतकं दिल्यानंतर आणखी वेगळं काही देण्याची आवश्यकता नाही. कदाचित हा दृष्टिकोन आमच्या स्थानिक विचारवंतांमध्ये असेल हे सहजपणे गमतीने आपल्याला मी सांगू इच्छितो”, असंही शरद पवार म्हणाले.