केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे आमदारपुत्र नितेश राणे यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. नारायण राणे यांनी शिवसेना सोडली तेव्हा त्यांना संपवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी अनेकदा सुपाऱ्या दिल्या होत्या असं नितेश राणेंनी ट्वीटरवरुन म्हटलं आहे. त्यानंतर मुंबईतील पत्रकार परिषदेतही त्यांनी आदित्य ठाकरेंवरही टीका केली. उद्धव ठाकरेंनी राणेंना संपवण्यासाठी सुपाऱ्या दिल्याच्या नितेश राणेंच्या आरोपांवरुन पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असताना पवार यांनी मोजक्या शब्दांमध्ये हा प्रश्न उडवून लावला. यावेळी त्यांनी नितेश राणेंचा उल्लेख ‘मुलंबाळ’ असा केला.

नक्की पाहा >> Photos: सोमय्यांनंतर शिंदे गटाकडून नारायण राणे आणि त्यांच्या पुत्रांना थेट इशारा; म्हणाले, “उद्धव ठाकरे, ‘मातोश्री’वर…”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नितेश राणेंचा आरोप काय?
“माझ्या वडिलांनी जेव्हा शिवसेना सोडली, तेव्हा एकनाथ शिंदेप्रमाणेच त्यांनाही मारण्यासाठी तथाकथित शांत आणि संयमी पक्षप्रमुखांकडून सुपाऱ्या देण्यात आल्या. हे ‘म्याव म्याव’ आता संपवून टाकूया आणि आपण व्याजासह वस्त्रहरण सुरु करु,” असा आरोप नितेश राणे यांनी ट्वीटरवरुन केला आहे.

नक्की वाचा >> ‘दिल्लीच्या आदेशानंतर शिंदे मुख्यमंत्री झाले तर फडणवीस उपमुख्यमंत्री’ यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले, “त्यांनी दगड…”

पवारांचं मोजक्या शब्दात उत्तर
नितेश राणेंनी केलेल्या या आरोपावरुन पुण्यामधील एका कार्यक्रमानंतर शरद पवार यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न पत्रकारांनी केला. उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंची सुपारी दिल्याचा आरोप नितेश राणेंनी केलाय, असं सांगत पत्रकाराने प्रश्न विचारला. त्यावर शरद पवार “मुलाबाळांच्या प्रतिक्रियेवर मी उत्तर देणं योग्य दिसत नाही,” असं म्हणत तिथून निघून गेले.

नक्की वाचा >> शिंदे विरुद्ध ठाकरे: निवडणूक आयोगाने बहुमताचा पुरावा सादर करण्याचे आदेश दिल्यानंतर राऊत म्हणतात, “वरुन बाळासाहेबांचा आत्मा…”

शिंदेंच्या सुरक्षेबद्दलही नोंदवलं मत…
आधीच झेड सुरक्षाव्यवस्था असलेल्या एकनाथ शिंदे यांना गडचिरोलीचे पालकमंत्री या नात्याने अधिक सुरक्षा होती. त्यामुळे शिंदे यांची सुरक्षा काढून घेतल्याचा दावा तथ्यहीन असल्याचे मत शरद पवार यांनी याच कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलंय. गडचिरोलीचे पालकमंत्री असतानाही एकनाथ शिंदे यांची सुरक्षाव्यवस्था तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढून घेतली होती, असा आरोप शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी केला होता. त्यासंदर्भात विचारले असता शरद पवार यांनी हे भाष्य केले. पवार म्हणाले, ‘मला वस्तुस्थिती माहित नाही. पण, शासनात अनेक वर्ष काम केल्याने मला हे माहिती की सुरक्षा पुरवण्याचा निर्णय मंत्रीमंडळ घेत नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याची चर्चा होत नाही. मुख्य सचिव, गृह सचिव आणि पोलीस महासंचालक यांच्या समितीमध्ये त्याचा निर्णय होतो. एकनाथ शिंदे यांना झेड दर्जाची सुरक्षाव्यवस्था होती आणि गडचिरोलीचे पालकमंत्री असल्याने त्यांना अधिक सुरक्षा होती. माजी गृहमंत्र्यांनी हे सांगितले आहे. त्यामुळे अधिक काही बोलायची गरज नाही.’

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar on nitesh rane saying uddhav thackeray given supari of narayan rane svk 88 scsg