पुणे : भाषा लवचिक असेल तरच तिचा प्रसार होतो. त्यासाठी बोली भाषेच्या प्रसाराला वाव द्यायला हवा. भाषेसंदर्भात टिंगलटवाळी टाळली पाहिजे, अशी अपेक्षा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली.
जागतिक मराठी अकादमी आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या वतीने आयोजित ‘शोध मराठी मनाचा’ या १८ व्या जागतिक मराठी संमेलनाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले आले. त्या वेळी ते बोलत होते. संमेलनाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर मुळे, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, रमाकांत खलप, खासदार श्रीनिवास पाटील, माजी संमेलनाध्यक्ष आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे आदी या वेळी उपस्थित होते. प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक डॉ. प्रमोद चौधरी यांना जागतिक मराठी भूषण पुरस्कार, ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना जागतिक मराठी गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मराठी भाषेचा व्यवहारात अधिकाधिक प्रसार होण्याच्या उद्देशातून जागतिक मराठी अकादमीची स्थापना झाली. पण कोणती बोली प्रमाण मानावी हा प्रश्न आहे. दर दहा मैलांना पाणी आणि वाणी बदलते. वऱ्हाडी, कोकणी, कोल्हापुरी, बेळगावी, मालवणी या बोलींचा संसार हा भाषेच्या सौंदर्यात भर घालणारा दागिना आहे, असे पवार म्हणाले.
विश्व मराठी संमेलनाकडे प्रेक्षकांची पाठ
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने वरळीमधील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, एनएससीआय डोम येथे आयोजित केलेल्या ‘मराठी तितुका मेळवावा’ या विश्व मराठी संमेलनासाठी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या विविध संघटनांना आमंत्रित करण्यात आले होते, परंतु या संमेलनाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याने आयोजकांची पंचाईत झाली. पहिल्या दिवशी मोकळय़ा खुर्च्या लक्ष वेधून घेत होत्या, तर अखेरच्या दिवशी प्रेक्षकांची तुरळक गर्दी होती.