पुणे: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी कुठेच नव्हते. मात्र, वेगळीच मोट बांधून सर्वाधिक जागा संपादन करणाऱ्या पक्षाला विरोधामध्ये बसविण्याचा शरद पवार साहेबांचा खेळ हा साऱ्या खेळांना गुंडाळणारा होता, अशी टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी गुरुवारी केली. ८२ वर्षांच्या खेळाडूंसोबत कोणी कोणताही खेळ करू शकत नाही. दिल्लीतून लिलावकर्ते राज्यातील सत्ता बळकट करण्यासाठी लक्ष ठेवून असले तरी या मातीखाली काय चालले हे पवार यांनाच समजते, असेही मुंडे म्हणाले.
आप्पा रेणुसे निर्मित ‘क्रीडाविश्वाचा आधारस्तंभ’ या शरद पवार यांच्यावरील कॉफी टेबल बुकचे प्रकाशन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी मुंडे बोलत होते. माजी कसोटीपटू चंदू बोर्डे, आमदार चेतन तुपे, कबड्डीपटू शांताराम जाधव, शकुंतला खटावकर, कुस्तीपटू काका पवार, अमोल बुचडे, खो-खो संघटक श्रीरंग इनामदार, ॲथलॅटिक्सचे संघटक अभय छाजेड, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे आणि शहराध्यक्ष प्रशांत जगताप या वेळी उपस्थित होते.
‘मी राखीव खेळाडू‘
प्रकृती अस्वास्थ्यामुळे विरोधी पक्षनेते अजित पवार या कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत. त्याचा संदर्भ देत मुंडे म्हणाले, विश्वचषक जिंकण्यासाठी प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली जाते. अशा वेळी राखीव खेळाडू म्हणून मी आलो आहे. पण, सामना जिंकून द्यायचा आहे याची जाणीव करून दिली. उसतोड मजुरांचा जिल्हा ही ओळख असलेल्या बीडमधील कष्टकऱ्यांना पोटाची खळगी भरता यावी यासाठी पवार यांनी श्रीनिवासन यांना विनंती करून परळीमध्ये सिमेंटची कारखाना सुरू करून दिला.
माशेलकर म्हणाले, आयुष्यात मला कोणताही खेळ जमला नाही. परंतु, मी खेळांचा भक्त आहे. बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या पवार यांच्या क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीची दखल घेतली गेली नव्हती. ती उणीव या पुस्तकाने दूर झाली. खेळाडूंचा आत्मसन्मान जपणारा नेता हे पवार यांचे वर्णन उचित आहे. उत्तमतेचा ध्यास आणि सर्वसमावेशक नेतृत्व असलेल्या पवार यांनी क्रिकेटबरोबरच कुस्ती, खो-खो, कबड्डी या मातीतील खेळांना उर्जितावस्था प्राप्त करून दिली. बोर्डे, जाधव, बुचडे यांनी मनोगत व्यक्त केले. आप्पा रेणुसे यांनी प्रास्ताविक केले. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. युवराज रेणुसे यांनी आभार मानले.