राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सद्यस्थितीत महाराष्ट्रात निर्माण होणाऱ्या कोणत्याही प्रश्नावर केंद्र सरकारमध्ये नितीन गडकरी भक्कमपणे महाराष्ट्राच्या मागे उभी असल्याचं सांगितलं. पुण्यात वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने राज्यस्तरीय साखर परिषद २०२२ चं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी शरद पवार बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शरद पवार म्हणाले, “साखर कारखानदारीसाठी राज्य सरकारची मदत हवीच असते. सुदैवाने आत्ताच्या राज्य सरकारमध्ये उसाबद्दल, कारखानदारीबद्दल जाण असणारे अनेक सहकारी आहेत. त्यामुळे त्यांचीही मदत होईल. आज केंद्र सरकारमध्ये महाराष्ट्रातील उसाचा, साखरेचा, इथेनॉलचा किंवा कोणताही प्रश्न आला तर एक व्यक्ती भक्कमपणे ऊस उत्पादकांच्या आणि महाराष्ट्राच्या मागे उभी असते आणि त्या व्यक्तीचं नाव नितीन गडकरी आहे. ते आज या ठिकाणी आहे याचा मला मनापासून आनंद आहे.”

“साखर उद्योगात महाराष्ट्र आता एक नंबर”

“सर्वांच्या प्रयत्नाने आपण साखर उद्योगात यश मिळवलं आहे. साखर उद्योगात महाराष्ट्र आता एक नंबर आहे. या क्षेत्रात प्रगती झाली याचा मला आनंद आहे, पण आता पुढील दिशा शोधण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. या अडचणीतून मार्ग काढणं गरजेचं आहे,” असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : “पुढच्या काळामध्ये माणसे गाडीत साखर किती टाकू हा प्रश्न विचारतील”; राज्यस्तरीय साखर परिषदेत मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य

“ऊस तोडणी वाहतूक प्रश्न गंभीर”

“मागील दोन वर्षात पाऊस चांगला होता. ऊस क्षेत्र वाढलं, हंगाम चांगला झाला. अजून ऊस क्षेत्र येणाऱ्या काळात वाढणार आहे. हवामान अंदाजानुसार पाऊस चांगला होणार आहे. त्यामुळे आता ऊस क्षेत्र वाढणार आहे आणि त्यासाठी ऊस तोड नियोजन करायला लागणार आहे. ऊस तोडणी वाहतूक प्रश्न गंभीर आहे,” असंही शरद पवार यांनी सांगितलं.

“भारतातील साखर जगातील १२१ देशांमध्ये पोहचली”

शरद पवार पुढे म्हणाले, “भारतातील साखर जगातील १२१ देशांमध्ये पोहचली. असं कधी झालं नव्हतं. अफगाणिस्तान साखरेचा सर्वात मोठा ग्राहक आहे. तिथली परिस्थिती बदलली आहे. साखर निर्यात चांगली झाली. देशात साखरेचे विक्रमी उत्पादन झालं आहे. मागील तीन हंगामात कारखान्यांनी निर्यातीला प्राधान्य दिलं.”

“ऊस पिकवणं गैर नाही”

“आपल्याकडे ऊस सोडून इतर कुठल्याही पिकाला हमीभाव मिळत नाही. त्यामुळे ऊस पिकवणं गैर नाही. विदर्भात ऊस वाढेल याची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी विदर्भात एक व्हीएसआयची शाखा काढण्याची मागणी नितीन गडकरी यांनी केली आहे. त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करता येईल. जमीन घेतली जाईल. त्याचे पैसे व्हीएसआय देईल,” असं शरद पवार यांनी सांगितलं.

“वीज बचतीसाठी सोलरकडे लक्ष देणे गरजेचं”

“विजेचे नवीन स्रोत म्हणून सोलरकडे पाहिलं पाहिजे. याकडे केंद्राने लक्ष दिलं पाहिजे. वीज बचतीसाठी सोलरकडे लक्ष देणे गरजेचं आहे. राज्य सरकार मदत करेल. आता केंद्र सरकारही मदत करेल,” असंही पवारांनी नमूद केलं.

या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, काँग्रेस नेते मंत्री बाळासाहेब थोरात, सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह आजी माजी मंत्री उपस्थित होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar praise nitin gadkari for helping to resolve maharashtra related issue in centre svk 88 pbs
Show comments