पुणे : या देशात राजे अनेक होऊन गेले. त्यांनी घराण्याच्या नावाने राज्य केले. पण, हिंदवी स्वराज्याची स्थापना करून छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य घडविले. सत्ता कोणासाठी आणि कशी वापरायची याचा छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श वस्तुपाठ आहेत, असे गौरवोद्गार माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मंगळवारी काढले.
अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीच्या वतीने लाल महाल येथे आयोजित ३४९ व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यात शरद पवार बोलत होते, पवार यांच्या हस्ते शिवराज्याभिषेक करण्यात आला. चित्रपट दिग्दर्शक दिक्पाल लांजेकर, पत्रकार ज्ञानेश महाराव, शीतल पवार, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, आबेदा इनामदार, आमदार संग्राम थोपटे, रवींद्र धंगेकर, चंद्रकांत मोकाटे, तुषार महाराज शिंदे आदींना पवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. खासदार वंदना चव्हाण, रोहित टिळक, मोहन जोशी, रमेश बागवे आणि समितीचे विकास पासलकर या वेळी उपस्थित होते.
हेही वाचा >>>शरद पवारांच्या मध्यस्थीनंतरही शिरूर मतदारसंघाचा तिढा सुटेना? विलास लांडेंच्या वक्तव्यानंतर चर्चेला पुन्हा सुरुवात
पवार म्हणाले, शिवराज्याभिषेक दिन हा देशाच्या इतिहासातील ऐतिहासिक दिवस आहे. शौर्य आणि कष्टाच्या बळावर शिवाजी महाराज यांनी रयतेचे राज्य उभे केले आणि राज्यकारभार स्वीकारण्याचा दिवस निश्चित केला. या देशात राजे अनेक होऊन गेले. त्यांचे राज्य घराण्याच्या नावाने चालले. शिवाजी महाराजांचे राज्य कधीही भोसले घराण्याचे नव्हते. राजे अनेक होऊन गेले असले तरी जनतेच्या अंतःकरणात घर करून राहिलेले शिवाजी महाराज हे एकमेव राजे आहेत.शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून ३५० विद्यार्थींनीचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्यात येणार असल्याचे पासलकर यांनी प्रास्ताविकात सांगितले.