“नाशिक पदवीधर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीचा प्रश्न नीट बसून हाताळता आला असता. आपापसात चर्चा करून हा प्रश्न सुटणे अवघड नव्हते. काँग्रेस नेत्यांनी सामंजस्य दाखविले असते तर हा उमेदवारीचा घोळ झाला नसता. अजूनही हा प्रश्न सुटू शकतो.” अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज(रविवार) पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील विजेता शिवराज राक्षे यांचा शरद पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना विविध मुद्य्यांवर प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – डॉ. सुधीर तांबे काँग्रेसमधून निलंबित; ‘हायकमांड’च्या मान्यतेने घेण्यात आला निर्णय!

यावेळी नाशिक पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना शरद पवार म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसकडे औरंगाबादची जागा, नागपूरची जागा शिवसेनेला आणि अमरावती आणि नाशिकची उमेदवारी काँग्रेसला देण्याचा निर्णय झाला होता. नाशिक पदवीधर मतदारसंघातील सध्याचे चित्र पाहता काळजी करण्यासारखेच आहे. हा विषय नीट हाताळता आला असता. काँग्रेसने ज्यांना अधिकृत उमेदवारी दिली. त्यांचे काम आणि सर्वांना बरोबर घेण्याची भूमिका चांगली आहे. मात्र तरूण कार्यकर्त्यांचा अर्ज आल्यानंतर चर्चेने हा प्रश्न सोडविता आला असता. ज्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे, ते युवक चळवळीशी सक्रिय आहेत. त्यामुळे प्रमुख नेत्यांनी आपासपसात चर्चा करून प्रश्न सोडविणे अवघड नव्हते. बाळासाहेब थोरात पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. विधिमंडळाचे ते गटनेता आहेत. टोकाची भूमिका ते घेत नाहीत. त्यामुळे सामंजस्याने हा प्रश्न सुटला असता.”

हेही वाचा – उमेदवारी अर्जाच्या गोंधळाची राज्यात जुनीच परंपरा

देवेंद्र फडणवीसांवर अप्रत्यक्षपणे टिप्पणी –

याशिवाय सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज भरण्यामागे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यावरून पवार यांनी फडणवीसांवरही नामोल्लेख न करता अप्रत्यक्षपणे टिप्पणी केली. “कोणीतरी श्रेय घ्यायचा प्रयत्न करत असले तर त्यांनी ते घ्यावे. श्रेय घेतल्याचा आनंद घ्यावा.” असं पवार म्हणाले.

हेही वाचा – सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देण्याबाबत बावनकुळेंचे सूचक वक्तव्य, म्हणाले “आम्ही संन्याशी…”

चंद्रकांत पाटलांना लगावला टोला –

राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्ह्यातील दादगिरी संपुष्टात आली आहे, असे विधान काही दिवसांपूर्वी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यासंदर्भात त्यांनी पाटील यांनाही टोला लगावला. “चंद्रकांत पाटील कोथरूडमधून निवडणूक लढले आणि विजयी झाले. कोथरूडमध्ये त्यांचे योगदान काय, हे कोथरूडकरांना विचारावे. स्वत:च्या जिल्ह्यातून निवडून येण्याची क्षमता नाही त्यांनी भाष्य करू नये.” असं शरद पवार म्हणाले.

Story img Loader