गेल्या दोन दिवसांपासून राज्यात आणि देशात देखील शरद पवारांच्या दिल्ली निवासस्थानी झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीची मोठी चर्चा दिसून आली. त्यासोबतच, या बैठकीला काँग्रेसची असलेली अनुपस्थिती देखील अनेकांना खटकली. त्यातून राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लढवले गेले. विशेषत: काँग्रेसला टाळून शरद पवार बिगर भाजपा पक्षांची मोट बांधत असल्याची चर्चा रंगली. या सर्व चर्चांच्या पार्श्वभूमीवर आज पुण्यामध्ये एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्रकारांनी संभाव्य बिगर भाजपा आघाडीविषयी आणि त्याच्या अध्यक्षपदाविषयी प्रश्न विचारला असता शरद पवारांनी त्यावर मिश्किल प्रतिक्रिया देताच उपस्थितांमध्ये हास्याची लकेर उमटली!

काय झालं बैठकीत?

२२ जून रोजी झालेल्या या बैठकीमध्ये राष्ट्रीय पातळीवरच्या अनेक पक्षांचे नेते उपस्थित होते. मात्र, या बैठकीत बिगर भाजपा आघाडीची चर्चा झाली नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजिद मेमन यांनी सांगितलं. “आज देशात जे राजकीय, आर्थिक व सामाजिक वातावरण बनलं आहे, त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी राष्ट्रमंचाची काय भूमिका असेल. यावर सर्वांचे मत घेण्यात आलं आहे. यामध्ये काही अराजकीय व्यक्ती देखील सहभागी होते. जावेद अख्तर, न्यायमूर्ती एपी शहा यांनी देखील आपलं मत मांडलं. म्हणून हा काही राजकीय कार्यक्रम नव्हता. ज्याचा चुकीच्या पद्धतीने प्रचार करणं उचित ठरणार नाही”, अशी भूमिका त्यांनी मांडली.

 

पर्यायी आघाडी काँग्रेससोबतच!

दरम्यान, या बैठकीविषयी शरद पवारांना विचारणा केली असता आम्ही आघाडी करण्यासाठी आत्ता बसलो नाही, असं ते म्हणाले. “आघाडीसाठी आम्ही काही आत्ता बसलेलो नाही. त्यासाठी चर्चाही केलेली नाही. पण पर्यायी आघाडी उभी करायची असेल तर काँग्रेसला सोबत घेऊनच करावी लागले. हीच भूमिका मी त्या बैठकीत मांडली. देशात आज लोकांना काही पर्याय असावा अशी जनतेची भावना आहे. ही लोकेच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी राजकीय नेतृत्वाची असते. ती आम्हाला निश्चितपणे करावी लागेल”, असं ते म्हणाले.

नैराश्यापोटी अनिल देशमुखांवर कारवाई, आम्हाला त्याची चिंता नाही – शरद पवार

शरद पवारांनी हे उद्योग फार वर्ष केलेत!

यावेळी पत्रकारांनी बिगर भाजपा आघाडीचं सामुदायिक नेतृत्व शरद पवारांकडे असेल अशी चर्चा सुरू असल्याबाबत विचारणा केली. त्यावर बोलताना, “आघाडीची चर्चाच केली नसल्यामुळे नेतृत्वावरही चर्चा केलेली नाही. पण सामुदायिक नेतृत्व हेच सूत्र पुढे ठेऊन आम्हाला पुढे जावं लागेल. मी फार वर्ष असले उद्योग केले आहेत. त्यामुळे सध्या यामध्ये पडायचं नाही. त्यांना मार्गदर्शन करणं, शक्ती देणं, मदत करणं, त्यांना एकसंध ठेवण्यासाठी प्रयत्न करणार”, असं शरद पवारांनी यावेळी स्पष्ट केलं.

Story img Loader