पुणे : राजस्थानातील पंतप्रधानांचे भाषण देशाच्या ऐक्याच्या विरोधात आहे. पंतप्रधान असे कसे बोलू शकतात, असा प्रश्न मला पडला. त्यांचा विरोध केला पाहिजे, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली. तसेच गेल्या १० वर्षांत मोदी सरकारच्या काळात शेतीसंबंधीचे प्रश्न वाढले आहेत. सन २०१४पासून अमित शहा यांच्या पक्षाकडे सत्ता आहे. केवळ माझ्यावर टीका करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी, त्यांच्या हितासाठी काय केले ते सांगावे. परंतु अमित शहा यांचे शेतीसंबंधीचे ज्ञान मर्यादित आहे, त्यावर जास्त काय बोलायचे, असा टोलाही पवार यांनी हाणला.
हेही वाचा >>> उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शक्तिप्रदर्शन; पुण्यात वाहतूककोंडी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे शपथपत्र प्रसिद्ध करण्यात आले. त्या वेळी पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या वेळी उपस्थित होते. नुकत्याच झालेल्या प्रचारसभेत अमित शहा यांनी पवार यांच्यावर शेती, शेतकरी यांच्यासंदर्भात टीका केली होती. मी कृषिमंत्री असताना तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग अमरावतीत आले होते. त्यांना तेथील शेतकऱ्यांचे प्रश्न, अडचणी प्रत्यक्षात दाखवून देण्यात आल्या. त्यानंतर कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला. गेल्या १० वर्षांत अमरावती, यवतमाळ आणि इतर जिल्ह्यांतील शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. काँग्रेसच्या काळापेक्षा आता दीडपट अधिक शेतकरी आत्महत्या होत आहेत. परंतु अमित शहा त्यावर काही बोलत नाहीत. वीस वर्षांआधी काय झाले, चाळीस वर्षांआधी काय झाले हे विचारण्यापेक्षा गेल्या १० वर्षांत मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय केले ते सांगावे, असेही पवार म्हणाले. निवडणुकीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. आता दुसऱ्या टप्प्याचे मतदान होणार आहे. याबाबत विचारले असता पवार म्हणाले, की पहिल्या टप्प्यात जनमत भाजपविरोधात गेले आहे. त्यामुळे भाजप अस्वस्थ आहे. म्हणून जात-धर्म, हिंदू-मुस्लिम मुद्दे घेतले जात आहेत.