राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी संभाजी ब्रिगेडच्या रौप्य महोत्सव कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमातून त्यांनी आरक्षण, शेतकरी आणि मराठा समाज आदि विषयांवर भाष्य केलं. दरम्यान, त्यांनी आरक्षण आणि नव्या पिढीचं अर्थकारण यावर आपलं मत व्यक्त केलं आहे.
संभाजी ब्रिगेड रौप्य महोत्सवी कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना शरद पवार म्हणाले, “बोलता-बोलता संभाजी ब्रिगेडला २५ वर्षे पूर्ण झाली. आज आपण रौप्य महोत्सव साजरा करत आहोत. प्रवीण गायकवाड यांनी पक्ष हातात घेतल्यानंतर, पक्षाचा विस्तार कसा वाढेल, याची काळजी घेतली. नव्या पिढीची शक्ती पक्षाभोवती उभी केली. हे सगळं करत असताना, संघटना म्हणून आज कोणत्या रस्त्याने जायला हवंय, याची चिकित्सा करून पक्षाला योग्य वळणावर नेण्याची खबरदारी त्यांनी घेतली. याचा मला मनापासून आनंद आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली.
या कार्यक्रमाप्रसंगी झालेल्या ‘आरक्षणाकडून अर्थकारणाकडे’ या विषयावर झालेल्या चर्चासत्राचा उल्लेख करत शरद पवार म्हणाले, “संभाजी ब्रिगेडने आरक्षणासाठी संघर्ष केला, मागण्या केल्या. आता आरक्षण-आरक्षण बस झालं, जोपर्यंत नव्या पिढीचं अर्थकारण बदलत नाही, तोपर्यंत समाजातील त्यांचं स्थान बदलणार नाही,” असं विधान शरद पवारांनी केलं.
हेही वाचा- ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्याकडून पोलिसांना मारहाण, सोशल मीडियावर VIDEO व्हायरल
आज मराठा म्हणलं की वेगवेगळ्या चर्चा केल्या जातात. काही लोक वेगळ्या दृष्टीने चर्चा करतात. मराठा म्हणताना मराठी माणूस लढाऊ माणूस असं चित्र होतं. मराठा समाजाचे वैशिष्ट्ये हे आहे की, समाजाची उन्नती कशी होईल? असा विचार मराठा समाज करत असतो, असंही पवार म्हणाले.