पुणे प्रतिनिधी : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन जवळपास दोन महिन्यांचा कालावधी लोटला. मात्र, या प्रकरणातील सातव्या आरोपीचा अद्यापपर्यंत शोध लागला नसून त्याचा शोध पोलिस घेत आहेत. तर या प्रकरणी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांकडून सातत्याने न्यायाची मागणी होत आहे. मात्र, त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप कुटुंबीयांकडून केला जात आहे. तर या पार्श्वभूमीवर संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी अन्न त्यागाचा इशारा दिला आहे.

त्या सर्व घडामोडीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज बीड येथे संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी संतोष देशमुख यांच्या पत्नी, आई आणि मुलीशी संवाददेखील साधला. त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकादेखील केली. त्या टिकेनंतर विविध राजकीय मंडळींकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली असून पुण्यात ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी सुप्रिया सुळे यांच्या बीड दौऱ्याचा प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधताना चांगलाच समाचार घेतल्याचे पाहण्यास मिळाले.

यावेळी लक्ष्मण हाके म्हणाले, “मस्साजोग येथे संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली, त्याबद्दल सुप्रिया सुळे यांचं स्वागत करतो, पण मी कायम बेगडी पुरोगामी नेता म्हणून शरद पवार यांचा उल्लेख करीत आलो आहे आणि त्यांचाच बेगडी पुरोगामीत्त्वाचा शिक्का सुप्रिया सुळे या त्यांच्या वर्तनातून दाखवून देत आहेत. त्याबद्दल सांगायचे झाल्यास, सुप्रिया सुळे यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर तालुक्यातील विक्रम दादासाहेब गायकवाड या तरुणाची हत्या झाली आहे. ती हत्या सुप्रिया सुळे यांना दिसली नाही. तसेच काही दिवसांपूर्वी माऊली सोट या तरुणाची हत्या झाली, ती हत्यादेखील त्यांना दिसली नाही. त्या सर्व घटना लक्षात घेतल्यानंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांना इतर जातींमधील हत्या दिसल्या नाहीत, तर या हत्येच्या अडून राजकारण करणारी टोळी असल्याचं सांगत त्यांनी पवार कुटुंबावर टीका केली.

पंधराशे मतांनी निवडून येणाऱ्या रोहित पवारांची स्पेस संपली: लक्ष्मण हाके

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्यात निवडणुकीच्या काळात सभा किंवा दौरे केले नाहीत. त्यांना स्पेस मिळत नव्हती, पण सुरेश धस यांचा वापर केल्याने देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी बीडमध्ये दरवाजा उघडला आहे, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. त्या प्रश्नावर ते म्हणाले, “विधानसभा निवडणुकीत रोहित पवार हे हजार पंधराशे मतांनी निवडून आले आहेत, त्यामुळे त्यांचीच स्पेस संपून गेली असून रोहित पवार हे कसेबसे निवडून आले आहेत. तर बीड जिल्ह्यात महायुतीचे आमदार निवडून आले आहेत, त्यामुळे बीड जिल्हा कोणाचा आहे आणि देवेंद्र फडणवीस यांना स्पेस शोधायची काय गरज आहे, असा सवाल उपस्थित करीत ते पुढे म्हणाले, “उत्तमराव जानकर, नारायण पाटील ही मंडळी दहा पंधरा हजार मतांनी निवडून आली आहे. तर पंधराशे मतांनी निवडून येणाऱ्या रोहित पवारांची स्पेस संपली आहे, हे पाहून घ्या; अशा शब्दात रोहित पवार यांच्यावर त्यांनी निशाणा साधला.

Story img Loader