राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या राजकीय जीवनातील एक किस्सा सांगितला आहे. यानुसार त्यांना एका कारखान्याच्या भूमिपुजनाला बोलावण्यात आलं होतं. ते तेथे गेले, नारळ फोडला, कुदळ मारली आणि भाषणाला उभे राहून इथं कारखाना होणार नाही असं म्हटल्याची आठवण शरद पवारांनी सांगितली. ते मंगळवारी (२४ ऑक्टोबर) पुण्यात आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वातील युवा संघर्ष यात्रेत बोलत होते.
शरद पवार म्हणाले, “माझा स्वतःचा एक अनुभव सांगतो. पुण्यापासून २० किलोमीटरवर एक साखर कारखाना होणार होता. त्या साखर कारखान्याच्या भूमिपुजनाला मला बोलावण्यात आलं. तो कारखाना काढणारे गृहस्थ आमचे मित्र होते. त्यांचं नाव नाना नवले असं होतं. नाना नवले कारखान्याचे चेअरमन होते. ते एकेकाळी महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सर्व विद्यापीठांमध्ये कुस्तीत पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक मिळवलेले कुस्तीपटू.”
“मी भूमिपुजनाला गेलो, नारळ फोडला, कुदळ मारली आणि इथं कारखाना होणार नाही सांगितलं”
“अशा नाना नवलेंनी सहकारी साखर कारखाना काढायचं ठरवलं. त्यांनी भूमिपुजनासाठी मला बोलावलं. मी तेथे गेलो, नारळ फोडला, कुदळ मारली, भाषणाला उभं राहिलो आणि सांगितलं की, इथं कारखाना होणार नाही. लोक म्हटले, अरे भूमिपुजनाला बोलावलं आणि कारखाना इथं होणार नाही सांगत आहेत. मी म्हटलं नाही होणार,” अशी आठवण शरद पवार यांनी सांगितली.
“हिंजवडीला एक प्रकारचा चमत्कार झालाय”
शरद पवार पुढे म्हणाले, “मी तुम्हाला दुसरी जागा देतो तिथं कारखाना काढा. ते म्हणाले की, तुम्हाला इथं काय करायचं आहे. मी म्हटलं की, मला इथं आयटी पार्कचं केंद्र सुरू करायचं आहे. त्यानंतर मी आयटीचं केंद्र काढलं. तुम्ही आज हिंजवडीला जाऊन पाहा. त्या ठिकाणी एक प्रकारचा चमत्कार झाला आहे. त्यावेळी जमीन पाहिजे होते.”
हेही वाचा : “स्वतःचा पक्ष ज्याला तिकीट द्यायला लायक नाही म्हणतो, त्याला…”; पवारांची घणाघाती टीका, म्हणाले…
“श्रीनिवास पाटलांनी ८ दिवसात हजार एकर जमीन उपलब्ध करून दिली”
“आयटी सेंटर काढायचं किंवा कोणताही उद्योगधंदा काढायचा असेल तर जमीन लागते. आता जमीन कुठून आणायची. मग मला आठवलं की, आमचा एक सहकारी होता आणि तो एमआयडीसीचा प्रमुख होता. त्याचं नाव श्रीनिवास पाटील. मी त्यांना सांगितलं आणि आठ दिवसांच्या आत काही हजार एकर जमीन अधिगृहीत करून ताब्यात दिली,” असंही शरद पवारांनी नमूद केलं.