पिंपरी : विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केलेल्या भोसरी मतदारसंघातील माजी नगरसेवक, पदाधिका-यांना पुन्हा स्वगृही परतण्याचे वेध लागले आहेत.  या माजी नगरसेवकांनी चूक झाल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली आहे. त्यामुळे या नगरसेवकांच्या प्रवेशावर लवकरच शिक्कामोर्तब होईल असे सूत्रांनी सांगितले. तसेच शिवसेना (ठाकरे) पक्षात असलेले माजी महापौर संजोग वाघेरे हेही अजित पवार यांच्या संपर्कात असल्याचे समजते.

महायुतीमध्ये भोसरीतून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी संधी मिळणार नसल्याचे लक्षात येताच राष्ट्रवादी काॅंग्रेसचे तत्कालीन शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी पक्षांतर केले.  गव्हाणे यांच्यासह २५ माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केला. गव्हाणे यांनी शरद पवार पक्षाकडून भाेसरीतून विधानसभा निवडणूक लढविली. मात्र, त्यांचा पराभव झाला. विधानसभा निवडणुकीत  राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचा दारुण पराभव झाला. तेव्हापासून या माजी नगरसेवकांमध्ये अस्वस्थतता निर्माण झाली आहे. त्यातच ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केला ते माजी आमदार विलास लांडे यांनी शहराचा विकास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे झाला आहे.  पवार कार्यकर्त्यांना ताकद देतात. त्यामुळे अजित गव्हाणे यांच्यासह सर्व माजी नगरसेवकांनी अजित पवार यांच्यासोबत यावे, यासाठी मी विनंती करणार असल्याचे सांगितले. या माजी नगरसेवकांनीही अजित पवार यांच्यासोबत चर्चा केली. त्यामुळे हे माजी नगरसेवक लवकरच स्वगृही परतणार असल्याचे निश्चित झाले आहे.

हेही वाचा >>>पुणे: महापालिका भवनजवळ दोघांना लुटले; रिक्षाचालकासह साथीदाारविरुद्ध गुन्हा

संजोग वाघेरे हेही स्वगृही परतणार?

मावळमधून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी शिवसेना (ठाकरे) पक्षात प्रवेश केलेले माजी महापौर संजोग वाघेरे हेही अजित पवार यांच्या संपर्कात आहेत. त्यांची स्वगृही परतण्याबाबत पवार यांच्याशी चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे ठाकरे यांच्या शिवसेनेलाही धक्का बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, पवार यांच्याशी चांगले संबंध आहेत. पण, अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याचे वाघेरे यांनी सांगितले.

मी कौटुंबिक कार्यक्रमासाठी बाहेर आहे.  शहरात आल्यावर सर्व सहकाऱ्यांशी चर्चा केली जाईल. त्यानंतर सर्वानुमते भूमिका जाहीर करण्यात येईल, असे अजित गव्हाणे यांनी सांगितले.

तर, शरद पवार, अजित पवार दोघेही आमचे नेते आहेत. आम्हाला अजित पवारांनी ताकद दिली. अजित पवार आणि अजित गव्हाणे यांच्यात चर्चा झाली आहे. गव्हाणे हे माजी नगरसेवकांसह अजित पवार यांच्यासोबत येतील. आम्ही कोणत्या पक्षात गेलो नव्हतो. पवार परिवारालाच मानत आहोत, असे माजी आमदार विलास लांडे यांनी म्हटले आहे.

लोकसभा, विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षांतर केलेल्यांनी चूक मान्य केली आहे. विनाअट स्वगृही येण्याबाबत अजित पवार यांच्याशी चर्चा झाली आहे. पवार जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) शहराध्यक्ष योगेश बहल यांनी सांगितले आहे.

Story img Loader