राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे नास्तिक असून ते मंदिरांमध्ये जात नाही अशी टीका काही आठवड्यांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. यावरुन बराच वाद झाला होता. असं असतानाच आज शरद पवार पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरामध्ये पोहोचले. यावेळी मंदिराच्या विश्वस्तांनी पवारांचं स्वागतही केलं. मात्र शरद पवारांनी मंदिरामध्ये एका खास कारणामुळे प्रवेश केला नाही. यासंदर्भातील माहिती राष्ट्रवादी काँग्रेसनेच दिलीय.
नक्की वाचा >> शरद पवारांविरोधातील पोस्ट प्रकरणानंतर पहिल्यांदाच केतकी चितळेने केलं भाष्य; हसत म्हणाली, “त्या दिवशी…”
झालं असं की, शरद पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भिडे वाड्याची बाहेरून पाहणी केली. त्यानंतर ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या प्रवेशद्वारावर पोहोचले. मात्र शरद पवार मंदिरात न जाता बाहेरूनच दर्शन घेऊन पुढे रवाना झाले. शरद पवार या ठिकाणी आले तेव्हा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या विश्वस्तांकडून शरद पवारांचा सत्कार करण्यात आला. शरद पवार यांच्या समर्थकांनी यावेळी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. मात्र पवार यांनी मंदिरामध्ये प्रवेश केला नाही. यामागील कारणाचा खुलासा राष्ट्रवादीनेच केलाय.
भिडे वाड्याच्या पाहणीसाठी शरद पवार येणार असल्याची माहिती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विश्वस्त मंडळींना मिळाली. त्यानंतर गणपतीच्या मंदिरात दर्शनासाठी येण्याचा आग्रह त्यांच्याकडून करण्यात आला. यावेळी शरद पवारांनी भिडे वाडंयाची आणि मंदिर परिसराची बाहेरून पाहणी केली. मात्र ते मंदिरामध्ये गेले नाहीत.
नक्की पाहा >> Photos: पुरंदरे, चितळे, मिटकरी, भुजबळ…; ब्राह्मण महासंघाने शरद पवारांसंदर्भात उघडपणे व्यक्त केली नाराजी
पवार यांनी मंदिरामध्ये जाण्याचं का टाळलं यासंदर्भात पुणे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. “शरद पवारांनी मांसाहारी जेवण केल्याने ते मंदिरामध्ये गेले नाहीत. चुकीचा पायंडा पडता कामा नये, असे त्यांनी मला सांगितलं,” अशी माहिती प्रशांत जगताप यांनी दिली.