पुणे : कै. बाळासाहेब दादा पासलकर यांच्या पुण्यस्मरणनिमित्त निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या कार्यक्रमाचे पुण्यात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात त्यांनी इंदोरीकर महाराजांवर केलेल्या विधानावर मोठा हशा पिकला.
“एक जण माणसात सहजपणानं चांगले संस्कार कसे करता येईल, हे चांगलं काम निवृत्ती महाराज करतात. त्याचबरोबर, आज मला त्यांचा कार्यक्रम ऐकण्याची संधी मिळाली नाही. पण, मी त्याचा लाभ पुन्हा घेतल्याशिवाय राहणार नाही, मी एवढाच इशारा त्यांना देऊ इच्छितो, असे शरद पवार यांनी म्हणताच कार्यक्रमात उपस्थित लोक पोट धरून हसू लागले.
कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, उपसभापती नीलम गोऱ्हे, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, काँग्रेस पक्षाचे नेते रविंद्र धंगेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मंडळींनी हजेरी लावली होती.
शरद पवार म्हणाले की, उद्या दिल्लीत सकाळच्या सुमारास संसदेचे अधिवेशन सुरू होत आहे. तसेच सकाळच्या वेळेत अधिक विमान ये-जा करित असतात. त्यामुळे या कार्यक्रमामधून जावं लागत आहे. तसेच, मला निवृत्ती महाराज यांचं कीर्तन ऐकण्याची इच्छा होती. त्यांच्या कीर्तनामध्ये गमती असतात. अनेकदा कीर्तन टीव्हीवर पाहत असतो. त्यांची अॅक्शन काय, त्यांची दिशा काय, मी त्यांच्या सर्व गोष्टी या ठिकाणी सांगत नाही. मात्र, एक जण माणसात सहजपणानं चांगले संस्कार कसे करता येईल, हे चांगलं काम निवृत्ती महाराज करतात. त्याचबरोबर, आज मला त्यांचा कार्यक्रम ऐकण्याची संधी मिळाली नाही. पण मी त्याचा लाभ पुन्हा घेतल्याशिवाय राहणार नाही. मी एवढाच इशारा त्यांना देऊ इच्छितो, असे त्यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.