पुणे : बारामती येथे एक आणि दोन मार्च रोजी होणाऱ्या नमो महा रोजगार मेळाव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण न देण्यावरून चर्चा सुरू झाली आहे. यावर प्रशासनाकडून माहिती देण्यात आली आहे.
कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने विभाग स्तरीय नमो महारोजगार मेळावा पुणे जिल्ह्यातील बारामती येथे आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा दोन आणि तीन मार्च रोजी होणार आहे. या मेळाव्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा, विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे. या शासकीय कार्यक्रमासाठी पुणे पिंपरी चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागातील सर्व लोकप्रतिनिधी म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार आणि विधानसभा आणि विधान परिषदेचे आमदार यांना निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र या कार्यक्रमाचे निमंत्रण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना न दिल्याने या पक्षाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा >>>बायोगॅस प्रकल्पामधून आता शुद्ध पाणी; शास्त्रज्ञ पार्थसारथी मुखर्जी यांचे संशोधन
” हा शासकीय कार्यक्रम असल्यामुळे या कार्यक्रमासाठी पुणे जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना निमंत्रण देण्यात आले आहे. “स्वतः शरद पवार यांनी राजशिष्टाचार विभागाला कोणत्याही शासकीय कार्यक्रमात माझे नाव टाकू नये, अशा स्पष्ट सुचना यापूर्वीच दिल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक शासकीय कार्यक्रमावेळी पवार यांचे नाव टाकण्यात येत नाही. त्यामुळे या कार्यक्रमातही नाव टाकण्यात आले नाही. मात्र आता पवार यांचे नाव निमंत्रण पत्रिकेत टाकण्यात येईल आणि नवी निमंत्रण पत्रिका तयार करण्यात येईल,” असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.