शरद पवार यांचं आता वय झालं आहे त्यांनी आता रिटायर्ड व्हावं असा सल्ला त्यांचे मित्र सायरस पूनावाला यांनी त्यांना दिला आहे. एवढंच नाही तर शरद पवार यांनी दोनदा पंतप्रधान होण्याची संधी घालवली आता त्यांनी आराम करावा, मी पण आरामच करतो आहे असंही सायरस पूनावाला यांनी म्हटलं आहे. सायरस पूनावाला यांनी पुण्यात पत्रकारांच्या एका प्रश्नावर उत्तर देत असताना हे वक्तव्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२ जुलै या दिवशी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे एकूण ९ आमदार होते ज्यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. पुढे खातेवाटपातही त्यांनी स्थान दिलं गेलं. अजित पवारांनी भाजपा आणि शिवसेनेबरोबर येणं हा राष्ट्रवादी काँग्रेससाठी सर्वात मोठा धक्का ठरला. यानंतर ५ जुलै या दिवशी झालेल्या भाषणात शरद पवारांनी आता आम्हाला आशीर्वाद द्यावा आणि जबाबदारीतून मुक्त व्हावं, निवृत्त व्हावं असं अजित पवार म्हणाले होते. तर शरद पवार यांनी अजित पवारांच्या या सल्ल्यावर तसंच प्रत्युत्तर दिलं होतं.

हे पण वाचा- राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा ‘शरद पवार’, पुन्हा मैदानात उतरत पवारांनी स्वीकारलं आव्हान

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फाटाफूट झाली आहे तरीही तुमच्या पक्षातला आश्वासक चेहरा कोण? असं जेव्हा शरद पवार यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी हात वर करुन शरद पवार असं उत्तर दिलं होतं. शरद पवार हे जुलै महिन्यापासूनच पक्षबांधणीला लागले आहेत. तसंच त्यांना जो निवृत्त होण्याचा सल्ला देण्यात आला तो त्यांनी मानलेला नाही. शरद पवार यांनी भाजपासह यावं यासाठी त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु केले आहेत. स्वतः शरद पवारांनीच याबाबत सांगितलं होतं. आता अजित पवार यांनी जो सल्ला दिला होता तो शरद पवार यांनी मानलेला नाही. अशात सायरस पूनावाला यांचा सल्ला शरद पवार ऐकणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

सायरस पूनावाला यांनी एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत असताना शरद पवार यांना रिटायर्ड व्हा असा सल्ला दिला आहे. तसंच आपलं आता वय झालं वय झाल्यावर आपण घरी आराम केला पाहिजे असंही त्यांनी म्हटलं आहे. या सगळ्यावर शरद पवार काही बोलणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar wasted the opportunity to become prime minister twice now he should retire says cyrus poonawalla svk 88 scj