पिंपरी: राज्यासह देशातील राजकारणात शरद पवार यांच्या अध्यक्षपदाच्या निवृत्तीवरून जोरदार चर्चा सुरू आहे. उद्या (शुक्रवारी) शरद पवार खरंच अध्यक्षपदावरून निवृत्त होणार की नाही हे समजणार आहे. यावरच राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी सूचक वक्तव्य केले असून शरद पवार यांच्या भावनांचा देखील विचार केला पाहिजे असे वक्तव्य कोल्हे यांनी पिंपरी- चिंचवडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केले आहे. पूर्ण विचारांती शरद पवार हे निर्णय घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
अमोल कोल्हे म्हणाले, “शरद पवार हे राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार आहेत की नाही यावर बोलणं योग्य नाही. गेली सहा दशके झालं महाराष्ट्रातील राजकारण शरद पवार यांच्या भोवती फिरत आहे. एक कार्यकर्ता म्हणून शरद पवार यांच्या भावना आपण समजून घेतल्या पाहिजेत असं मला वाटतं.”
आणखी वाचा- पक्षाध्यक्षपदावरून निवृत्तीनंतर शरद पवार रविवारी सोलापुरात
ते पुढे ते म्हणाले, “महाराष्ट्रातील राजकारण हे शरद पवार आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या भोवती अनेक दशके फिरत असल्याचे आपल्या पिढीने पाहिले. शरद पवार यांनी जो निर्णय घेतला आहे हे बघता, दिल की सुने या दिमाग की असा पेच निर्माण झाला आहे. पण, उद्या (शुक्रवारी) शरद पवार हे पूर्ण विचारांती निर्णय घेतील” असा विश्वास कोल्हे यांनी व्यक्त केला. पुढे ते म्हणाले, “खासदार सुप्रिया सुळे, विरोधीपक्षनेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी याविषयी बोलणं झालं आहे. त्यामुळे आमच्यात गट- तट आहेत हे केवळ तर्क वितर्क आहेत.”