‘‘अभिरुची स्वातंत्र्य जपण्यासाठी समांतर सेन्सॉरशिपला धाडसाने सामोरे जा. आपले विचार साहित्यातून प्रकट झाल्यावर वाद उभे राहिल्यास त्याला भिडण्याची तयारी ठेवा.’’ असा सल्ला देत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी, तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी लिखित साहित्य असलेली पुस्तके आनंद देत राहतील, हा दिलासा लेखकांना शुक्रवारी दिला.
सासवड येथील ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. संमेलनाचे अध्यक्ष प्रा. फ. मुं. शिंदे, मावळते अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, साहित्य महामंडळ अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोशाध्यक्ष सुनील महाजन, माजी संमेलनाध्यक्ष मधू मंगेश कर्णिक, ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर, स्वागताध्यक्ष विजय कोलते, निमंत्रक रावसाहेब पवार, खासदार सुप्रिया सुळे, माजी खासदार रामदास आठवले, आमदार विजय शिवतारे, नगराध्यक्षा नीलिमा चौखंडे, पुण्याच्या महापौर चंचला कोद्रे या वेळी उपस्थित होते.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपण्यासाठी साहित्यिकांनी समांतर सेन्सॉरशिपला धाडसाने सामोरे जावे. सखाराम बाइंडर, घाशीराम कोतवाल अशा कलाकृतींनाही विरोध झाला. वादाला सामोरे जावे लागले. परंतु, आज याच कलाकृती वस्तुपाठ म्हणून शिकविल्या जातात. अशा विषयात काळ हाच न्यायाधीश म्हणून उभा असतो. याकडे पवार यांनी लक्ष वेधले. जे विकले जाते, तेच पिकविले जाते. परंतु, अशा काळातही गेल्या काही वर्षांत आशयप्रधान साहित्याची निर्मिती होत आहे आणि त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे, असे ते म्हणाले. बदलत्या, नव्या तंत्रज्ञानाच्या काळात पुस्तकांचे काय होणार, असा प्रश्न विचारला जातो. मात्र मला त्याची चिंता वाटत नाही. जोवर कागदाचा वास आहे. पानोपानांचा स्पर्श आहे आणि डोळ्यांना सुखावणारे मुद्रण आहे, तोवर पुस्तके आनंद देतच राहतील, असे त्यांनी नमूद केले. साहित्य संमेलने ही समाजाची सांस्कृतिक गरज आहे. उत्सवाप्रमाणेच संमेलनामधूनही सामाजिक भावना सुदृढ होते, असे त्यांनी सांगितले.
‘मराठी सक्तीची करा’
बालवाडीपासून ते पदव्युत्तर अभ्यासक्रमापर्यंत प्रत्येकाला मराठी भाषा सक्तीची करा, अशी मागणी संमेलनाध्यक्ष फ. मुं. शिंदे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून केली. तसेच राज्य सरकारने वाङ्मयीन पुरस्कारांची रक्कम वाढविली असली तरी त्यांची संख्या कमी केली आहे. ती पूर्ववत करावी, असेही ते म्हणाले. त्याबरोबरच महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणूस पाठीशी उभा राहिला, तर सीमा प्रश्न सोडविण्यास मदत होईल, असे शिंदे यांनी सांगितले. कोलते यांनी प्रास्ताविक केले. पायगुडे यांनी आभार मानले. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फ. मुं. उवाच..
– मी अत्रेंच्या वंशातला आणि लेखनाच्या अंगाने अंशातला आहे
– मराठवाडा ही संतांची आणि उसंतांची भूमी आहे
– माझ्या बायकोचे नाव लीला असल्यामुळे मला लीलापुरुष म्हणतात
– माणूस पाठमोरा आणि कागद पाठकोरा वाचू शकतो, त्यालाच अंतकरणाच्या वेदना समजतात
– जिथे सल आहे तिथे अस्सल आहे
– हृदयाचा सत्कार सगळेच करतात. लिव्हरचा सत्कार फक्त कवीच करू शकतो. आम्ही त्याला काळीज म्हणतो. कागदावर लिहिण्याआधी कवी काळजावर लिहितो.

फ. मुं. उवाच..
– मी अत्रेंच्या वंशातला आणि लेखनाच्या अंगाने अंशातला आहे
– मराठवाडा ही संतांची आणि उसंतांची भूमी आहे
– माझ्या बायकोचे नाव लीला असल्यामुळे मला लीलापुरुष म्हणतात
– माणूस पाठमोरा आणि कागद पाठकोरा वाचू शकतो, त्यालाच अंतकरणाच्या वेदना समजतात
– जिथे सल आहे तिथे अस्सल आहे
– हृदयाचा सत्कार सगळेच करतात. लिव्हरचा सत्कार फक्त कवीच करू शकतो. आम्ही त्याला काळीज म्हणतो. कागदावर लिहिण्याआधी कवी काळजावर लिहितो.