पक्षात बदल करण्याची गरज व्यक्त करत आगामी काळात नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचे संकेत पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईतील बैठकीत दिले आणि पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादीतील ‘प्रतीक्षा’ यादीतील इच्छुकांच्या आशा चांगल्याच पल्लवित झाल्या.
लोकसभा निवडणुकातील पराभवाची कारणमीमांसा करतानाच आगामी विधानसभा निवडणुकांची मोर्चेबांधणी करण्याच्या हेतूने पवार यांनी मुंबईत बोलावलेल्या बैठकीस पिंपरी-चिंचवडमधील आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे, शहराध्यक्ष योगेश बहल, उपमहापौर राजू मिसाळ, युवक अध्यक्ष मयूर कलाटे, कामगार नेते यशवंत भोसले आदी उपस्थित होते. बैठकीत बोलताना पवारांनी आगामी काळात नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचे सूतोवाच केले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत सध्याच्या उमेदवारांना नारळ मिळणार, असा सोयीचा अर्थ घेत राजकीय वर्तुळात भलतीच चर्चा सुरू झाली. भोसरी विधानसभेसाठी गेल्या वेळी मंगला कदम यांना, तर पिंपरी मतदारसंघात अण्णा बनसोडे यांना उमेदवारी होती. तत्कालीन परिस्थितीन अनेक इच्छुक होते. त्यांना आशादायक चित्र दिसू लागले आहे. चिंचवड मतदारसंघ काँग्रेसच्या वाटणीला होता. तो मतदारसंघ काँग्रेसकडून राष्ट्रवादीकडे घ्यावा, अशी मागणी कलाटे यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawars indication regarding change in party structure