‘शारंगधर’ हे नाव ऐकले की सर्वप्रथम त्यांची नेहमी बघायला मिळणारी ‘सकाळी पोट टकाटक’ ही जाहिरातच आठवते. काढे आणि चूर्णाच्या स्वरूपातील आयुर्वेदिक औषधे गोळ्यांच्या स्वरूपात आणली तर लोकप्रिय होऊ शकतील, या विचारातून या कंपनीने १९८६ पासून उत्पादन सुरू केले. पुण्यात कोंढव्यात बनणारी ही औषधे आता अमेरिका, जपान आणि जर्मनीमध्येही पोहोचली आहेत.
आयुर्वेदिक औषधे बनवणाऱ्या कंपन्यांपैकी एक मोठे नाव म्हणजे ‘शारंगधर’. राज्यात अगदी तालुका पातळीपासून त्यांची औषधे उपलब्ध आहेत. इतकेच नव्हे, तर शेजारी राज्यांमध्ये आणि बाहेर देशांमध्येही हा व्यवसाय चांगला विस्तारला आहे. पुण्यात सुरू झालेल्या या कंपनीच्या औषधांचे संपूर्ण उत्पादन कोंढव्यात होते.
डॉ. जयंत अभ्यंकर आणि त्यांचे बंधू मुकुंद अभ्यंकर ही कंपनी सांभाळतात. अभ्यंकर यांचे आई-वडील दोघेही आयुर्वेदिक डॉक्टर. वडील आयुर्वेद रसशाळेत उत्पादन व्यवस्थापक म्हणून काम करत. स्वत: औषधनिर्मिती व्यवसाय सुरू करण्याची त्यांची खूप इच्छा होती. जयंत यांनी भौतिकशास्त्रात पदवी घेऊन पुढे इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले होते, तर त्यांचे मोठे बंधू मुकुंद हे चार्टर्ड अकाऊंटंट. त्यामुळे आयुर्वेदाशी या दोघांचा थेट संबंध नव्हता. आयुर्वेदिक औषधनिमिती सुरू करायची असेल तर दोन मुलांपैकी कुणीतरी आयुर्वेदात पदवी घ्यावी, असे वडिलांनी त्यांना सुचवले. जयंत यांना स्वत:ला व्यवसायात रस होताच. त्यांनी आयुर्वेदाचे शिक्षण घ्यायचे ठरवले व पुणे विद्यापीठातून त्यांनी बीएएमएस पदवी प्राप्त केली. याच दरम्यान १९८६ मध्ये अभ्यंकर कुटुंबीयांनी ‘शारंगधर’ या नावाने औषधनिर्मिती सुरू केली. शारंगधर हे विष्णूचे नाव.
शिवाय शारंगधर नावाच्या ऋषींनी लिहिलेली शारंगधर संहिताही महत्त्वाची मानली जाते. शुद्ध, प्रमाणित आणि परिणामकारक औषधे कशी तयार करावीत याविषयी त्यात त्यांनी लिहिले आहे. आपल्या व्यवसायासाठी हे नाव सयुक्तिक वाटल्यामुळे अभ्यंकरांनी ते निवडले.
उत्पादन तयार करून त्याच्या विक्रीसाठी प्रयत्न करण्याऐवजी लोकांची गरज ओळखून त्यावर आधारित उत्पादने बनवावीत असे त्यांनी ठरवले. लोकांना आयुर्वेदाची माहिती आहे, परंतु त्यातील औषधे काढे, चूर्ण अशा स्वरूपात असल्यामुळे बरेचसे लोक ते टाळून तुलनेने घेण्यास सोप्या असलेल्या अॅलोपॅथिक औषधांकडे वळतात, असे जयंत अभ्यंकर यांचे मत. मग ‘शारंगधर’ने आयुर्वेदिक औषधे गोळ्यांच्या रुपात आणण्यास सुरुवात केली. हळूहळू ती लोकप्रिय होऊ लागली. डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनशिवायही घेता येतील अशा चाळीस ‘ओव्हर द काऊंटर’ मिळणाऱ्या गोळ्यांसह ११० आयुर्वेदिक औषधे ते बनवतात.
प्रथम ‘शारंगधर’ औषधे केवळ पुण्यात मिळायची. त्यानंतर मुंबईत आणि उर्वरित महाराष्ट्रात अगदी तालुका पातळीवरही ती मिळू लागली. राज्यात त्यांची औषधे विकणारे एक हजार फ्रँचायझी दुकानदार आहेत. गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्येही या औषधांचे वितरण होते, तसेच १९९१ नंतर अमेरिका, जपान आणि जर्मनीमध्ये व्यावसायिक स्वरूपात ती निर्यात होऊ लागली. जी औषधे निर्यात होतात तीच देशातही विकली जातात, असे अभ्यंकर सांगतात. आयुर्वेदिक औषधांमध्ये ‘एक्सपायरी डेट’ ही संकल्पना त्यांनी १९८६ पासूनच सुरू केली होती. आयुर्वेदिक औषधांची परिणामकारकताही ३ ते ५ वर्षांच्या कालावधीनंतर कमी होत जाते, शिवाय ‘आयुर्वेदिक औषधे जेवढी जुनी तेवढी चांगली,’ हा नियम सर्वच आयुर्वेदिक औषधांना लागू होत नाही, त्यामुळे ‘एक्सपायरी’ छापणे गरजेचे आहे, असा त्यांचा विचार होता.
‘प्रत्येक वैद्यकीय शाखेची स्वत:ची बलस्थाने आहेत. तातडीच्या वेळी रासायनिक औषधे वापरणे आवश्यक आहे. परंतु त्यांचा वापर मर्यादित स्वरूपातच केलेला चांगला,’ असे जयंत सांगतात. ‘रोगांचा समूळ नाश’ या संकल्पनेवर आधारित प्रदर्शने भरवण्यास ‘शारंगधर’ने सुरुवात केली. तसेच त्यांनी साध्या आजारांसाठी दूरध्वनीवर सल्ला देणारी ‘हेल्थलाईन’ सेवाही सुरू केली आहे. सध्या दहा डॉक्टर या दूरध्वनी लाईनवर सल्ला देतात. ‘शारंगधर’चे पुण्यात तीन दवाखाने आहेत, तर माडीवाली कॉलनी येथील प्रमुख कार्यालयाच्या इमारतीत दवाखान्याबरोबर पंचकर्म केंद्रही आहे. यापुढे राज्यभर आणि बाहेरही पंचकर्म दवाखान्यांची साखळी उभारण्याचे त्यांचे नियोजन आहे.
आयुर्वेदिक औषधे बनवण्यासाठी चांगल्या दर्जाच्या व पुरेशा प्रमाणात वनस्पती उपलब्ध न होण्याची समस्या जवळपास सर्वच आयुर्वेद औषध कंपन्यांना जाणवते. ‘शारंगधर’ने आपल्या पुरता त्यावर उपाय शोधला आहे. गेली चार वर्षे ते काही शेतकऱ्यांशी करार करून त्यांना आयुर्वेदिक वनस्पतींची बी-बियाणे व रोपे देतात आणि त्यांच्याकडून कच्चा माल खरेदी करतात. सध्या पश्चिम महाराष्ट्रातील चाळीस शेतकऱ्यांशी त्यांनी करार केले आहेत. परंतु विदर्भ आणि मराठवाडय़ाच्या कमी पावसाच्या पट्टय़ातही वाढू शकतील अशाही काही औषधी वनस्पती असून त्याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला हवी, असे अभ्यंकर सांगतात.
‘शारंगधर’चे संपूर्ण उत्पादन १९९३ पासून कोंढव्यातील वीस हजार चौरस फूट जागेतील कारखान्यात होते. तिथेच त्यांची प्रयोगशाळाही आहे. पूर्वी मात्र त्यांचे उत्पादन सहकारनगरमध्ये होत असे. १९८६ च्या सुमारास आयुर्वेदिक औषध व्यवसायातील स्पर्धाही पारंपरिक स्वरूपातील होती. परंतु ‘शारंगधर’ने दाणेदार स्वरूपातील (ग्रॅन्यूलर) च्यवनप्राश, ‘कूलकंद’ या नावाने विकला जाणारा सुका दाणेदार गुलकंद, अशी काही वेगळ्या प्रकारची उत्पादनेही आणली.
प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करणाऱ्या पुणेकराचा उत्पादनांना मिळणारा प्रतिसाद खूप महत्त्वाचा वाटतो. प्रत्येक उत्पादनाबरोबर ते अभिप्रायासाठी एक
चिठ्ठी देतात. उत्पादन वापरणाऱ्याने ती भरून कंपनीस पाठवायची असते. अभिप्राय कमी प्रमाणात आले तरी त्यांचा खूप उपयोग होतो, असे अभ्यंकर सांगतात.
sampada.sovani@expressindia.com